ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन; अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*
अकलूज (प्रतिनिधी) – चित्रपटसृष्टी आणि लावणी कलावंत ज्येष्ठ अभिनेत्री *मधु कांबीकर (वय 73)* यांचे आज सकाळी 12 ऑक्टोबर रोजी पुण्यातील येरवडा, शास्त्रीनगर येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले
.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी कलाक्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. कथ्थकचे प्रशिक्षण घेऊन 1973 मध्ये लालबागच्या न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली.अकलूज येथील तमाशा परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना परिषदेचे अध्यक्ष सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले होते.
तसेच अकलूज जयंती समारंभ समितीने आयोजित केलेल्या अकलूज लावणी स्पर्धेमध्ये त्यांना सन 2007 चा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.आपल्या कलेतून आपली ओळख करत सिनेसृष्टीत स्थान मिळवणाऱ्या आणि लावणी कलाक्षेत्रात अनेक नवीन कलाकारांना पारंपरिक लावणीचे धडे देणाऱ्या मधु कांबीकर यांनी *’सखी माझी लावणी’* या कार्यक्रमातून देशभर तसेच परदेशातही लावणीचे कार्यक्रम केले व महाराष्ट्राची सांस्कृतिक कला आणि अकलूजच्या लावणीला सातासमुद्रापार पोहोचवले
.त्यांच्या निधनाबद्दल जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, “आपल्या कलेतून ओळख निर्माण करून सिनेसृष्टीत स्थान मिळवले आणि लावणीला सातासमुद्रापार नेले,” अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा व लावणी स्पर्धेच्या आयोजक स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनीही श्रद्धांजली वाहिली. यावेळी लावणी स्पर्धेचे सर्व सदस्य उपस्थित होते.







