४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
अकलूज (प्रतिनिधी) :अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काही महिन्यांपूर्वी याच रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलने सलग ३२ दिवस बातम्या प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या वृत्तमालिकेनंतर बांधकाम विभागाने सुमारे ४९ लाख रुपयांचे टेंडर काढून सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले होते.
मात्र, अवघ्या काही महिन्यांतच रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत

.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दुचाकीस्वारांना खड्डे चुकविताना कसरत करावी लागत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.
लाखो रुपये खर्च करून केलेली दुरुस्ती इतक्या कमी कालावधीत निष्प्रभ ठरत असेल, तर या कामाचा दर्जा, वापरलेले साहित्य आणि कामाच्या तपासणीची जबाबदारी कोणाची, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील समस्त ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांची छायाचित्रे असलेला फलक उभारून त्यावर ‘खड्डेमय रस्त्यावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहर्ष स्वागत !’ असा उपरोधिक संदेश देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी संघर्ष योद्धा न्यूजने सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून हा प्रश्न मांडला होता.
त्यानंतर दुरुस्तीचे काम झाले; मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे झाल्याने केवळ तात्पुरती मलमपट्टी करून प्रश्न सुटणार नाही, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
आता ग्रामस्थांची मागणी स्पष्ट आहे — रस्त्याची कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करावी,
झालेल्या कामाची गुणवत्ता तपासावी आणि निकृष्ट काम आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी.प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.






