अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या ! क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन
अकलूज | प्रतिनिधी
अकलूज नगरपरिषद हद्दीत प्रांताधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या मध्यभागी, तसेच अकलूज पोलीस ठाण्याजवळ कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली शासकीय इमारत गेल्या पाच महिन्यांपासून वापराविना पडून असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
या इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करावे; अन्यथा माळशिरस तालुक्यातील पत्रकारांसाठी ‘पत्रकार भवन’ उभारण्याकरिता ही इमारत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड आणि पत्रकार रणजितदादा गायकवाड यांनी ही मागणी केली आहे.
कोट्यवधींची इमारत धूळखात; कार्यालय स्थलांतराची प्रतीक्षा
अकलूज येथे दुय्यम निबंधक कार्यालयासाठी नव्याने बांधण्यात आलेली शासकीय इमारत गेल्या पाच महिन्यांपासून तयार असूनही तिचा वापर सुरू झालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित कार्यालयाचे स्थलांतर अथवा उद्घाटन झाले नसल्याने इमारत आणि परिसरात स्वच्छतेचा अभाव दिसून येत असून, सर्वत्र धूळ आणि अडगळ साचल्याचे चित्र असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या इमारतीचा वेळेत उपयोग व्हावा, यासाठी संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी. दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्याला पत्रकार भवनाची प्रतीक्षा
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेसाठी माळशिरस तालुक्यात स्वतंत्र पत्रकार भवन उपलब्ध नसल्याचा मुद्दाही या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
पत्रकारांना बैठका, चर्चा, पत्रकार परिषदा आणि विविध सामाजिक प्रश्नांवर विचारविनिमय करण्यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता आहे.
यासाठी पत्रकार बांधवांकडून वेळोवेळी शासन व प्रशासनाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत; मात्र अद्याप या मागणीला मूर्त स्वरूप मिळाले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे
.पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी, महसूल विभाग आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा. पत्रकारांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून अकलूज नगरपरिषद हद्दीत शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणीनव्याने बांधण्यात आलेल्या शासकीय इमारतीचा तातडीने उपयोग करून दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित करावे. तसे शक्य नसल्यास, नियमानुसार आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ही इमारत पत्रकार भवनासाठी उपलब्ध करून देण्याच्या पर्यायाचा विचार करावा, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यातील पत्रकारांच्या भावनांचा विचार करून लोकप्रतिनिधी, महसूल विभाग आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करावी व या प्रलंबित प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड आणि पत्रकार रणजितदादा गायकवाड यांनी केली आहे.
चौकट :-कोट्यवधींच्या इमारतीचा वापर सुरू करा!अकलूज येथे दुय्यम निबंधक कार्यालयासाठी बांधून तयार असलेल्या शासकीय इमारतीत तातडीने कार्यालय स्थलांतरित करावे. अन्यथा, प्रशासकीय नियमांनुसार ही इमारत पत्रकार भवनासाठी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घ्यावा. माळशिरस तालुक्यातील पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी लक्षवेधी मागणी करण्यात आली आहे.





