अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती, शंकरनगर अकलूज यांच्या वतीने दि. २८ फेब्रुवारी व दि. १ मार्च २०२६ रोजी स्मृतीभवन, शंकरनगर अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी दिली.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.पुढे बोलताना ते म्हणाले की, जयंती समारंभ समितीचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षींच्या अमृत महोत्सवी जयंती वर्षानिमित्त जानेवारी १९९३ पासून राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला सुरुवात केली होती. सन २०१८ पर्यंत ही स्पर्धा अविरतपणे पार पडली.
या व्यासपीठामुळे अनेक लावणी कलाकारांना परदेशात कार्यक्रम करण्याची संधी मिळाली तसेच अनेकांना चित्रपट व रिअॅलिटी शोमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली. अकलूजची लावणी देशाबरोबरच परदेशातही पोहोचली.
समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी हा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला असून सन २०२४ पासून स्पर्धेला नव्या जोमाने पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या स्पर्धेचे नियोजन सुरू आहे.
यंदा स्पर्धेचे २९ वे वर्ष असून सहकार महर्षींच्या १०८ व्या जयंतीनिमित्त स्मृतीभवन, शंकरनगर येथील बादशाही रंगमंचावर या स्पर्धा होत आहेत.
महाराष्ट्रातील एकूण ११ निवडक पार्ट्यांना सहभाग देण्यात आला आहे.पारंपरिक व नवकवींच्या लावण्यांचा नजराणा, ढोलकीची थाप, घुंगरांची साथ, पदन्यासाची नजाकत तसेच पेटीची संगत यांचा सुरेख अनुभव रसिकांना लाभणार आहे.
यावेळी समितीचे सुभाष दळवी, महादेव अंधारे, अशोक जावळे, विजय दोशी, पोपटराव भोसले पाटील, बिभिषन जाधव, संजय गळीतकर, सुहास थोरात, सतीश यादव आदी उपस्थित होते.
प्रवेशिकेसाठी संपर्क: ९७६४११३६९५
भव्य पारितोषिके
प्रथम क्रमांक – रुपये ३,००,०००द्वितीय क्रमांक – रुपये २,००,०००तृतीय क्रमांक – रुपये १,००,०००उत्कृष्ट नृत्यांगना – रुपये ५,००० व कै. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील स्मृती चषकउत्कृष्ट अदा (वैयक्तिक) – रुपये ५,०००उत्कृष्ट मुजरा – रुपये ३,०००उत्कृष्ट ढोलकीपटू, उत्कृष्ट पार्श्वगायिका, उत्कृष्ट पेटीवादक व उत्कृष्ट तबलावादक – प्रत्येकी रुपये १,०००
सहभागी पार्ट्या
शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६वैशाली समसापुरकर – जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडीकाजल-स्वाती जळगावकर – अलंकार सांस्कृतिक कला केंद्र, सुपा (जि. अहिल्यानगर)बेला, श्रद्धा नेटूरकर – जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र, खोसपुरी पंढरीचापूल (जि. अहिल्यानगर)अपर्णा, कीर्ती नगरकर – लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी (जि. पुणे)गीता, श्रुती वाईकर – रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, गोकुळ शिरगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर)
रविवार, दि. १ मार्च २०२६छाया, पूजा, श्रद्धा कोल्हापूरकर – रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप वाठार (जि. कोल्हापूर)जोत्स्ना वाईकर – पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे (ता. वाई, जि. सातारा)नटरंग सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी – मोडनिंब (ता. माढा, जि. सोलापूर)राजनंदिनी सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी – यवत चौफुला (जि. पुणे)वैष्णवी कोल्हापूरकर – रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप वाठार (जि. कोल्हापूर)न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी – यवत चौफुला (जि. पुणे)
ही स्पर्धा लावणीप्रेमींसाठी एक सांस्कृतिक पर्वणी ठरणार असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







