गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी
प्रतिनिधी -रणजितदादा गायकवाड
शौर्याला आवाज नसतो, पण त्याचा प्रभाव संपूर्ण देशाला जाणवतो. जम्मू-काश्मीरच्या दुर्गम जंगलात दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ‘टायसन’ या प्रशिक्षित स्निफर डॉगने अद्वितीय धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखवली.
गोळीबारात गंभीर जखमी होऊनही त्याने दहशतवाद्यांचा अचूक माग काढत जवानांना महत्त्वाची माहिती दिली.सुरक्षा दलांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जंगल परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत होती.
यावेळी दहशतवाद्यांकडून अचानक गोळीबार सुरू झाला. या चकमकीत ‘टायसन’ जखमी झाला; मात्र रक्तबंबाळ अवस्थेतही त्याने दहशतवाद्यांचे अचूक ठिकाण शोधून दिले. त्याच्या मदतीने कुख्यात दहशतवादी सैफुल्लासह तिघांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, टायसनने शेवटच्या क्षणापर्यंत आपले कर्तव्य बजावत जवानांना सतत मार्गदर्शन केले. त्यामुळे मोठा धोका टळला आणि मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
या कारवाईदरम्यान एकूण सात दहशतवाद्यांचा नायनाट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.सध्या ‘टायसन’वर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या शौर्याबद्दल सुरक्षा दलांनी आणि स्थानिक नागरिकांनी अभिमान व्यक्त केला आहे
.देशसेवेत स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या या वीर श्वानाबद्दल सर्वत्र कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे.
“टायसन हा फक्त एक प्राणी नाही, तर देशाचा खरा रक्षक आहे,”
अशा शब्दांत अनेकांनी त्याच्या धैर्याला सलाम केला आहे.







