सस्टनेबल फॅशनमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःची ओळख करणारी अकलूज च्या “निशा’ची ‘निशाणी’ पोहचली साता समुद्रापार..
अकलूज (गणेश जाधव )भारतीय परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचा सस्टेनेबल फॅशनच्या माध्यमातून साता समुद्रा पार डंका वाजवणाऱ्या अकलूज च्या कु.निशा कुंडलिक गायकवाड ने आपल्या ‘निशाणी’ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठसा उमटवला.

तिने केलेल्या या कार्याबद्दलअकलूज येथे 2मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती निमित्त, PM USHA योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड टेक्नॉलॉजी, विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, रोटरी क्लब सराटी डिलाईट, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) यांच्या संयुक्त विद्यमाने नव उद्योजक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी उत्तुंग कामगिरी करणाऱ्या निशाचा यशस्वी उद्योजक म्हणून माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन तिचा यथोचित सन्मान करण्यात आला.
आपल्या या यशात आई सौ, शुभांगी कुंडलिक गायकवाड व वडील कुंडलिक गायकवाड यांचा व मित्र मंडळी यांचा मोलाचा वाटा असल्याचे निशाने आवर्जून सांगितले.
*संवेदनशीलतेतून साकारलेली ‘निशाणी’ एक सस्टेनेबल फॅशन ब्रँडची प्रेरणादायी कहाणी.*
कु. निशा कुंडलिक गायकवाड यांचा प्रवास वाफेगाव ते अकलूज आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचला आहे.माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथील मूळची रहिवाशी असलेल्या निशाला लहानपणापासून चित्रकला व हस्तकलेची आवड होती. त्यानंतर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण झालेंनंतर सस्टेनेबल फॅशनमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांचा ‘निशाणी’ हा ब्रँड केवळ फॅशनसाठी नाही, तर भारतीय परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचा प्रतिनिधी आहे.
*शिक्षण आणि कौशल्याचा पाया.*

लहान गटापासून ते बारावीपर्यंतचे शिक्षण ‘शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज’ या संस्थेमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एस.एन.डी.टी. युनिव्हर्सिटीच्या पुण्यामधील स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधून फॅशन डिझाईनमध्ये पदवी घेतली. पदव्युत्तर शिक्षण टेक्सटाईल डिझाईन स्पेशली इंडियन क्राफ्ट्स या विषयात करत असताना जयपूर येथील प्रसिद्ध नीला हाऊस या संस्थेत नैसर्गिक लाल रंगांवर संशोधन आणि प्रयोगही त्यांनी केले. यानंतर राजस्थानमधील रूमा देवी फाउंडेशन, बाडमेर येथे कार्यरत राहताना त्यांनी ग्रामीण महिलांसोबत काम करून कौशल्याधारित अनुभव घेतला
.*निशाणी’ – नावातच एक भावना.*
‘निशाणी’ या ब्रँडमागील संकल्पना अतिशय भावनिक आणि भारतीय संस्कृतीशी जोडलेली आहे. आपल्या आजी-आजोबांची, आपल्या माणसांची एखादी आठवण म्हणून आपण काही वस्तू जपून ठेवतो, त्यालाच ‘निशाणी’ म्हणतात.
या भावनेतून जन्माला आलेला हा ब्रँड परंपरा, आठवणी, वारसा आणि टिकाऊपणाचा संगम आहे.
*प्रदर्शनातून केलेली सुरुवात, शोरूमपर्यंतची वाटचाल.*
‘निशाणी’ या ब्रँडची सुरुवात जानेवारी २०२३ मध्ये एका प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली. त्यानंतर वर्षभरात, २० ऑगस्ट २०२४ रोजी अकलूजमध्ये, जिजामाता कन्या प्रशालेच्या समोर पहिले भव्य शोरूम उघडण्यात आले.
*नैसर्गिकता आणि शाश्वततेचा वारसा.*
‘निशाणी’ ब्रँडमध्ये वापरण्यात येणारे सर्व कपडे नैसर्गिक रंगांपासून तयार केले जातात. हे रंग पर्यावरणपूरक असून त्वचेसाठी अतिशय सुसह्य आहेत. सर्व कलेक्शन्स हातमागावर विणलेली असून, त्यामुळे ते केवळ पर्यावरणपूरक नाही, तर वारसिक परंपरेषी सुसंगत आहेत. या कपड्यांमुळे कोणत्याही प्रकारची अॅलर्जी अथवा त्वचेची तक्रार होत नाही.ब्रँडच्या कलेक्शनमध्ये कुर्तीज, सेट्स, हॅण्डब्लॉक प्रिंटेड साड्या, आणि विविध हस्तनिर्मित डिझाईन्सचा समावेश आहे. प्रत्येक डिझाईन भारतीय परंपरेला आणि कलेला आदरपूर्वक साकारते
.*आंतरराष्ट्रीय पातळीवरही उपस्थिती.*
‘निशाणी’ केवळ स्थानिक नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही कार्यरत आहे. ब्रँडने आतापर्यंत दोहा, दुबई आणि सिंगापूर येथे यशस्वी निर्यात ऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत. तसेच पुणे, अहमदाबाद, चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमधील सस्टेनेबल फॅशन प्रदर्शनांमध्येही ‘निशाणी’ने उपस्थिती दर्शवली आहे.
सध्या ब्रँड B2B (बिझनेस टू बिझनेस) ऑर्डर्सही स्वीकारल्या जात आहेत. विविध स्टोअर्स आणि प्लेटफॉर्म्ससाठी कस्टमाइज सस्टेनेबल कलेक्शन्स तयार करण्याचे काम देखील सुरु आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये वाटचाल करीत वडिलांनी अकलूज मध्ये सुरु केलेल्या कॉटनकिंग या फ्रेंचायजी चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निशाने स्वतःचा ब्रँड तयार करून तो सातासमुद्रापार पोहचवून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. एव्हढे मात्र निश्चित.
आजकालच्या मुलींनी नोकरीच्या मागे न लागता आपल्याला आवडत असलेले क्षेत्र निवडून स्वतःचा व्यवसाय करावा. असे निशा आवर्जून सांगते.तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.







