११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि शाश्वत विकास : जबाबदार समाजाची गरज
दरवर्षी ११ जुलै हा दिवस संपूर्ण जगभर ‘जागतिक लोकसंख्या दिन’ (World Population Day) म्हणून साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या, आरोग्य, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, पर्यावरण, रोजगार आणि शाश्वत विकास यांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) १९८९ मध्ये या दिवसाची सुरुवात केली. जगातील लोकसंख्येने ५ अब्जांचा टप्पा पार केल्यानंतर लोकसंख्येशी संबंधित प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. लोकसंख्या ही कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी ताकद असते. योग्य शिक्षण, उत्तम आरोग्य, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील तर लोकसंख्या ही देशाच्या प्रगतीचे इंजिन बनते. परंतु लोकसंख्या वाढीचा वेग उपलब्ध संसाधनांपेक्षा जास्त असेल तर अनेक सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. त्यामुळे लोकसंख्येचे व्यवस्थापन ही काळाची गरज आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. देशाची लोकसंख्या ही आपल्या विकासाची संधी आहे, परंतु त्याचबरोबर ती मोठी जबाबदारीही आहे. प्रत्येक नागरिकाला अन्न, पाणी, निवारा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी नियोजन आवश्यक आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांमध्ये गर्दी, वाहतूक कोंडी, झोपडपट्ट्यांचा विस्तार, पाण्याची टंचाई, प्रदूषण, बेरोजगारी आणि नैसर्गिक संसाधनांवर वाढता ताण यांसारख्या समस्या अधिक तीव्र होत आहेत.लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरणावरही गंभीर परिणाम होतो. जंगलतोड, जैवविविधतेचा ऱ्हास, भूजल पातळी घटणे, हवामान बदल, कचऱ्याचे वाढते प्रमाण आणि प्रदूषण या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पृथ्वीवरील संसाधने मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य आणि शाश्वत वापर करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
लोकसंख्या नियंत्रणाचा अर्थ केवळ कुटुंबाचा आकार कमी करणे असा नाही. त्यामध्ये महिलांचे शिक्षण, मुलींचे सक्षमीकरण, मातृ व बाल आरोग्य, पोषण, कुटुंब नियोजन, सुरक्षित मातृत्व, लिंग समानता आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा यांचा समावेश होतो. शिक्षित आणि जागरूक समाजच लोकसंख्या वाढीवर प्रभावी नियंत्रण ठेवू शकतो.
महिलांचे शिक्षण हे लोकसंख्या स्थिरीकरणातील सर्वात प्रभावी साधन मानले जाते. शिक्षित महिला स्वतःच्या आरोग्याबाबत सजग असते, योग्य निर्णय घेते आणि आपल्या मुलांच्या शिक्षणालाही प्राधान्य देते. त्यामुळे कुटुंबाचे आणि समाजाचे जीवनमान उंचावते. म्हणूनच “शिक्षित महिला म्हणजे सशक्त समाज” ही संकल्पना आज अधिक महत्त्वाची ठरते.
आजच्या काळात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांनी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, लोकसंख्या शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. कौशल्याधारित शिक्षण, रोजगारनिर्मिती, उद्योजकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून लोकसंख्येला राष्ट्रीय विकासासाठी सकारात्मक शक्तीत रूपांतरित करता येते.शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लोकसंख्या शिक्षणावर विशेष भर देणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्व, आरोग्यविषयक जागरूकता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विकसित झाली तर भविष्यातील भारत अधिक सक्षम बनेल.
शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था, आरोग्य कर्मचारी आणि शासन यांनी एकत्रितपणे जनजागृती केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.
संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये (Sustainable Development Goals – SDGs) आरोग्य, शिक्षण, लिंग समानता, गरिबी निर्मूलन, स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण यांना विशेष महत्त्व दिले आहे. लोकसंख्या आणि शाश्वत विकास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे.
संतुलित लोकसंख्या आणि संसाधनांचा योग्य वापर यामुळेच भावी पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडू शकते.आजच्या डिजिटल युगात लोकसंख्येची गुणवत्ता वाढविण्यावर भर देणे अधिक गरजेचे आहे. निरोगी, सुशिक्षित, कौशल्यसंपन्न आणि जबाबदार नागरिक हेच राष्ट्राची खरी संपत्ती आहेत. त्यामुळे लोकसंख्या वाढीपेक्षा मानवी विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
जागतिक लोकसंख्या दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून प्रत्येक नागरिकाला आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. छोट्या कुटुंबाचा स्वीकार, महिलांचा सन्मान, मुलींचे शिक्षण, आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि जबाबदार नागरिकत्व या माध्यमातून आपण विकसित भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान देऊ शकतो.”लोकसंख्या ही समस्या नाही; योग्य नियोजन, शिक्षण आणि जबाबदार नागरिकत्वाचा अभाव ही खरी समस्या आहे.”
त्यामुळे प्रत्येकाने लोकसंख्या, पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखण्याचा संकल्प करूया.घोषवाक्ये- छोटे कुटुंब – सुखी कुटुंब.- शिक्षित समाज, सशक्त भारत.- लोकसंख्या संतुलित, विकास सुनिश्चित.- महिलांचे सक्षमीकरण म्हणजे राष्ट्राची प्रगती.- निरोगी कुटुंब, समृद्ध देश .– प्रा. अमोल बाळासाहेब बंडगर(जीवशास्त्र) अकलूज






