खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
खळवे, (प्रतिनिधी )खळवे परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खळवे येथील सोमनाथ सावंत यांच्या घराजवळ बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच तरसे यांच्या शेतातून दसूर ओढ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरही बिबट्याचा वावर आढळल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळील तोंडले गावातील वासुदेव भोरे यांच्या सुमारे एक वर्षे वयाच्या जर्सी कालवडीवर वन्यप्राण्याने हल्ला करून ती अर्धवट फस्त केल्याची चर्चा आहे.
मात्र, या घटनेला अद्याप वन विभागाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “घटनास्थळी पथक पाठवून पाहणी करण्यात येत असून, त्यानंतर वस्तुस्थितीची माहिती दिली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, खळवेचे सरपंच कांतीलाल पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच, बिबट्या दिसल्यास किंवा त्याच्या हालचाली आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ वन विभाग किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामस्थांनी रात्री अथवा पहाटे एकटे शेतात जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि अंधारात बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे
. परिसरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि सतर्क राहून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन करण्यात येत आहे.







