इंटरनॅशनल फालमफोक या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक अकलूज येथील प्रा. धीरज गुरव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अकलूज ((गणेश जाधव )
परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास कोणतेही ध्येय साध्य होतेच हे सिद्ध करून दाखवले आहे अकलूजच्या प्रा.धीरज गुरव याने..धीरज याने माणूस परिस्थितीने गरीब असला तरी चालेल; मात्र तो विचाराने कधीच गरीब असू नये.आपल्या कडे काय नाही यापेक्षा आपल्याजवळ काय आहे याचाच विचार करून त्यातून सकारात्मक विचार करीत *इंटरनॅशनल फालमफोक* या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आलेला धीरज हा अकलूज मध्ये राहत आहे.धीरजला अगदी लहानपणापासून नृत्य कलेची आवड आहे. इयत्ता पाचवी पासून त्याने 125 हुन अधिक राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकावली आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने आपले संपूर्ण शिक्षण नृत्य कलेच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातूनच पूर्ण केले. धीरजचे वडील श्री.दिलीप गुरव हे व्यवसायाने टेलर आहेत; मात्र वडिलांच्या मेंदूला रक्त पोहचत नसल्याने वडील गेली 23 वर्षे कोणतेही काम करत नाहीत ते घरीच असतात.मग संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली ती धीरज यांच्या आई आणि आज्जीवर. आई सौ.पुष्पा गुरव गेली 23 वर्षें अकलूज मधील शिवशंकर बझार या ठिकाणी स्वच्छतेच काम करत. धीरज इयत्ता १२ वी पासून अकलूज परिसर व माळशिरस आणि इंदापूर तालुक्यातील शाळांना नृत्य दिग्दर्शनाचे काम करत आहे.आदरणीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळ समूह नृत्य स्पर्धा, शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित गौरव मराठी मातीचा,गौरव भारतीय लोककलेचा च्या निमित्ताने तालुक्यातील सर्व शाळांना नृत्य दिग्दर्शन करण्याचे काम केले आहे.अगदी खेडेगावातील आतापर्यंत 1500 हुन जास्त विद्यार्थ्यांना नृत्य आणि प्रसंगानुरूप अभिनय शिकवण्याचे काम केले आहे.प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धेत नृत्य आणि अभिनय शिकवत असतानाच त्यांच्यातील दिग्दर्शक होण्याची आवड निर्माण झाली आहे. पुढे त्याने बी.कॉमच्या शिक्षणासाठी अकलूज मधील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व तिथून तो कलाकारांचे आश्रयस्थान धैर्यशील मोहिते पाटील, तसेच प्रा.विश्वनाथ आवड सर यांच्या मार्गदर्शनाने सोलापूर युवा महोत्सवात वेगवेगळ्या कला प्रकारात सहभागी झाला. सोलापूर युवा महोत्सवात एकांकिका,मुकनाट्य,लघुनाट्य,लोकनृत्य, या कलाप्रकारात घवघवीत यश संपादन करत उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनेता व उत्कृष्ट लोकनृत्य हे पुरस्कार त्याने मिळवले.तिथून पुढे उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.कॉमला प्रवेश घेतला.व एम.कॉम उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच पहिल्याच प्रयत्नात प्राध्यापक होण्यासाठी लागणाऱ्या SET परीक्षेत सुद्धा यश मिळवले. सध्या प्रा.धीरज गुरव हे शंकरराव मोहिते महाविद्यालयातच वाणिज्य विभागात काम करत आहेत. इंटरनॅशनल फालमफोक चित्रपटाचा मुख्य नायक योगेश खिलारे हा त्याचा लहानपासूनचा आणि जिवलग मित्र आहे. दोघेही लहानपणापासून नृत्य स्पर्धेला जात असत. २०१४ मध्ये शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक श्री.नागराज मंजुळे अकलूज मध्ये महाविद्यालयात आले असताना धीरज नागराज यांना भेटला. तेव्हाच धीरजने प्रखरतेने ठरवले की आपण चित्रपट तयार करूया..कारण धीरज हा नागराज मंजुळे यांना आपला आदर्श दिग्दर्शक मानतो.मग योगेश आणि धीरज यांनी लेखक लारा साळुंखे सरांची भेट घेतली. आता खरा प्रवास सुरु झाला होता तो “इंटरनॅशनल फालमफोकचा!” धीरज,योगेश आणि लेखक साळुंखे सर हे गेल्या 10 वर्षांत इंटरनॅशनल फालमफोकच्या निमित्ताने मुंबई,सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील 40 हुन जास्त निर्मात्यांना भेटले. काही निर्माते हा चित्रपट करू म्हणायचे..काहीजण नंतर करू म्हणायचे…तर काहीजण लगेच चालू करू म्हणायचे; पण प्रत्यक्ष पैसे कोणी देत नव्हते. धीरज आणि योगेश ने ठरवले की आता जर आपण अनेक निर्माते शोधत बसलो तर अजून पुढील १०,१५ वर्षं आपल्याला असच फिरत बसावं लागेल मग दोघांना एक कल्पना सुचली की आपण आपल्या जवळचे पैसे घालू आणि जवळच्या मित्रांकडून वर्गणीच्या स्वरूपात पैसे मागून बघू! या नुसार वर्गणी करून व स्वनिर्मितीतुन हा चित्रपट बनवण्यात आला.चित्रपट बनवताना जवळचे मित्रमंडळी नातेवाईक यांनी खूप मोलाची मदत केली. इंटरनॅशनल फालमफोकचे सर्व श्रेय धीरज त्याच्या मित्रांना व नातेवाईकांना देतो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,पुणे येथे धीरज आणि योगेश या दोघांच्या नावातुन एक-एक अक्षर घेत “धीयो फिल्म्स” ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. त्यातूनच तयार झाला तो “इंटरनॅशनल फालमफोक” हा चित्रपट. सर्वजण विचारतात “फालमफोक” म्हणजे काय ? तर धीरज म्हणाला “फालमफोक” या शब्दाचा अर्थ गुप्त राहणंच चांगलं आहे.ज्यावेळी सर्वजण चित्रपट पाहतील त्यावेळी त्यांना या फालमफोक शब्दाचा अर्थ समजेल. चित्रपट तयार करताना अनेक आर्थिक अडचणी आल्या. मात्र त्या अडचणींवर मात करत आता चित्रपट अनेक चित्रपट महोत्सवात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील भव्य दिव्य असा “२५ वा सांस्कृतिक कलादर्पण मराठी चित्रपट पुरस्कार २०२३,मुंबई” येथील महोत्सवात एकूण ४२ मराठी चित्रपटातून अंतिम १० चित्रपटात “इंटरनॅशनल फालमफोक” हा चित्रपट निवडला गेला आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाला “बाबुराव पेंटर स्मरणार्थ, कलानगरी कोल्हापूर मराठी चित्रपट महोत्सवात” दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये उत्कृष्ट अभिनेता पदार्पण : योगेश खिलारे, व उत्कृष्ट विनोदी अभिनेता : तानाजी गळगुंडे याला पुरस्कार जाहीर झाले. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कृत “९ वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात” सुद्धा हा चित्रपट दाखल झाला आहे. आणि लवकरच हा चित्रपट “६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,दिल्ली” येथे सहभागी होणार असून अकलूज परिसरातून धीयो फिल्म्स निर्मित इंटरनॅशनल फालमफोकचे दिग्दर्शक प्रा.धीरज गुरव व संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. कारण अतिशय सामान्य परिस्थितीतील तरुण व नवख्या दिग्दर्शकाने समाजातील नवोदित दिग्दर्शकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.आज 5एप्रिल 2023 हरहुन्नरी कलाकाराचा 29वा वाढदिवस त्यानिमित्ताने हृदयापासून हृदयापर्यंत खूप खूप शुभेच्छा.
शुभेच्छुक :-गणेश लक्ष्मण जाधव.पत्रकार. अकलूज.शिवाजी घोडके, योगेश खिलारे, राहुल माने, हर्षवर्धन भुतनाळ, रोहित सूर्यवंशी,हितेश पुंज आणि मित्र परिवार अकलूज
















