*अयोध्या नगरी दीपोत्सवासाठी सज्ज, यंदा पंतप्रधान मोदी दिपोत्सवाला उपस्थित राहणार*
अयोध्या : सालाबादप्रमाणे यंदाही अयोध्या नगरी दीपोत्सवासाठी सज्ज झाली आहे. यंदा दीपोत्सवात विश्वविक्रम केला जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यात म्हणजेच रामजन्मभूमीवर दरवर्षी दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा या दीपोत्सवात सुमारे 18 लाख पणत्या पेटवून विश्वविक्रम केला जाणार आहे. अयोध्येत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. आज अयोध्येमध्ये दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. दिवाळीनिमित्त आयोजित या सोहळ्यामध्ये आतिशबाजी, लेझर शो आणि रामलीलाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, शरयू काठावर एका भव्य संगीतमय लेझर शोचं आयोजन करण्यात येणार आहे. यंदा योगी सरकारकडून अयोध्येत भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी आणि रामलल्ला येथे फुलांची विशेष सजावट करण्यात आली आहे. खास विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.







