*पेरते व्हा संदेश देणारा पावश्या पक्ष्याचे अकलूज परिसरात आगमन!*
पावसाळ्याचे चाहूल लागताच पावसाचे सांगावा देणारा पावश्या पक्षी अकलूज परिसरात गेल्या आठवड्यात येऊन दाखल झाला आहे. उत्तरेकडील भागात मूळ वास्तव्याला असणारा हा पक्षी पावसाळ्याच्या प्रारंभी म्हणजे रोहिणी व मृग नक्षत्र बरसण्याच्या दिवसात हमखास पश्चिम महाराष्ट्रात येऊन दाखल होतो. कोकिळाच्या आकाराच्या या स्थलांतरित पक्ष्याला लांबलचक शेपटी असून त्यावर तपकिरी रंगाचे आडवा पट्टे असतात. त्यामुळे शेपूट नक्षीदार वाटते. त्यांची चोच हिरवट असून तिच्या दोन्ही बाजूला काळा रंग असतो. पावश्या हे पक्षी प्रजननासाठी सोलापूर जिल्ह्यात स्थलांतर करून येतात. मार्च ते जुलै हा काळ त्यांचा विणीचा काळ असतो. हे पक्षी स्वतःचे घरटे बांधत नाहीत. कोकिळासारखे हे पक्षीही परभृत आहेत. हे पक्षी सातभाई पक्ष्यांच्या घरट्यात आपली अंडी ठेवून उबवून घेतात व पिल्ले मोठी झाल्यावर त्यांना घेऊन पावसाळ्याच्या शेवटी आपल्या मूळ स्थानाकडे परततात. सातभाई पक्ष्यांमध्ये सुध्दा प्रजनन काळ याच दिवसात असतो. या दिवसात मादीला आकर्षित करून मिलनासाठी नर पावश्या उच्च स्वरात कंपनयुक्त आवाजात ओरडतो. त्यांच्यातील हे ओरडणे बऱ्याच वेळा मध्यरात्री पासून मध्यान्ह पर्यंत चाललेले असते. कर्णमधुर वाटणारे त्यांचे ओरडणे सुरुवातीला खालच्या पट्टीतले असते नंतर आवाज वरच्या पट्टीत जात इतकी उंची गाठतो की तो आवाज नकोसा वाटतो. रात्री व शांत वातावरणातील या पक्ष्यांचे ओरडणे म्हणजे शांत झोपी गेलेल्यांचे डोके भणभणून जाते. याच कारणावरून या पक्ष्याला इंग्रजीत ‘ब्रेन फीवर बर्ड’ असे नाव दिले आहे. यांचे ओरडणे वेगवेगळ्या प्रांतातील माणसांना वेगवेगळ्या पद्धतीने ऐकू येते. महाराष्ट्रातील लोकांना पेरते व्हा… पेरते व्हा…किंवा पाऊस आला.. पाऊस आला..कुळव..कुळव..असे ऐकू येते. चौकट: हे पक्षी सुरवंट, वाळवी, पतंग,पंखवाली मुंगी व इतर कीटकांसह केसाळ अळ्या आवडीने खातात. वड, पिंपळ, बोर, चेरी या झाडांच्या फळांवरही यांचे उदरनिर्वाह चालते.~~~प्राचीन काळापासून पक्षी आणि पाऊस यांचा संबंध असल्याचे लोककथेतून ऐकायला मिळते व पक्षी पावसाचा सांगावा घेऊन येतात अशी अख्यायिका आहे. पावसाळ्याला प्रारंभ झाल्याचे संदेश घेऊन येणारा पावश्यापक्षी सद्या जिल्ह्याच्या सर्वच शेतशिवारामध्ये पेरते व्हा पेरते व्हा अशा आरोळ्या ऐकायला मिळत आहे. – डॉ अरविंद कुंभार ज्येष्ठ पक्षी संशोधक व पर्यावरण अभ्यासक













