आषाढी वारीत महिला वारकऱ्यांसाठी ‘हिरकणी’चा आधार; सोलापूर जिल्ह्यात १७० कक्ष, माळशिरसमध्ये ५० कक्षांची उभारणी
अकलूज : (प्रतिनिधी)आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध मानाच्या पालख्यांबरोबर लाखो वारकरी सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहेत.
या वारकऱ्यांमध्ये महिला भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पालखी मार्गावर १७० ‘हिरकणी कक्ष’ उभारले आहेत.
या कक्षांच्या व्यवस्थापनासाठी पर्यवेक्षिका व ३६४ अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यात पालखी आगमनानंतर धर्मपुरी येथे हिरकणी कक्षाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा महिला व बालविकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले आणि बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांच्या हस्ते झाले.
माळशिरस व अकलूज या दोन्ही प्रकल्पांत एकूण सहा मुक्काम आणि ३१ विसावे असून, त्यासाठी ५० हिरकणी कक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
अकलूज येथील स. मा. वी.च्या प्रांगणासह विविध ठिकाणी हे कक्ष उभारण्यात आले आहेत.हिरकणी कक्षांमध्ये स्तनदा मातांसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्तनपान कक्ष, विश्रांतीसाठी बेड, सॅनिटरी पॅड, सॅनिटरी इन्सिनरेटर मशीन, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, स्वच्छ पिण्याचे पाणी, डस्टबिन तसेच महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
त्यामुळे महिला वारकऱ्यांना वारीदरम्यान मोठा दिलासा मिळत आहे.
संग्रामनगर येथे उभारलेल्या हिरकणी कक्षात माळीणगर-१ व बोरगाव बिटच्या पर्यवेक्षिका वैशाली टेके यांनी जबाबदारी सांभाळली.
तर अकलूज येथील कक्षात माळीणगर-२ व ३ च्या पर्यवेक्षिका रंजना कदम तसेच अंगणवाडी सेविकांनी सेवा बजावली
.दरम्यान, अभिनेते भाऊ कदम आणि ‘पारू’ मालिकेतील अभिनेत्री संजना पाटील यांनी अकलूज येथील हिरकणी कक्षाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. महिला वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे त्यांनी मनापासून कौतुक केले
.यावेळी सोलापूर जिल्हा महिला व बालविकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड तसेच माळशिरस प्रकल्प अधिकारी आस्मा आतार यांनी तालुक्यातील सर्व हिरकणी कक्षांना भेटी देऊन व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.







