माळशिरस तालुक्यातील अकलूज प्रकल्पांतर्गत सहा गावांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदांची भरती; २७ जुलैपासून अर्ज स्वीकारणार
अकलूज (प्रतिनिधी): एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) प्रकल्प अकलूज (ग्रामीण), पंचायत समिती माळशिरस अंतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
या भरतीअंतर्गत सहा गावांतील सहा अंगणवाडी केंद्रांसाठी प्रत्येकी एक अशा एकूण सहा अंगणवाडी मदतनीस पदांची भरती करण्यात येणार आहे.
पात्र व इच्छुक महिला उमेदवारांकडून दि. २७ जुलै ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
भरतीसाठी संबंधित गावातील किंवा संबंधित नगरपंचायत/नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी महिला उमेदवार पात्र असतील.
उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक व इतर कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, अकलूज (ग्रामीण), पंचायत समिती माळशिरस येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गावनिहाय रिक्त पदांचा तपशील दत्तनगर (खंडाळी): दत्तनगर-१ अंगणवाडी केंद्र,आनंदनगर: जाधव वस्ती अंगणवाडी केंद्र,बागेचीवाडी: बागेचीवाडी-२ अंगणवाडी केंद्र,अकलूज: लोणार गल्ली-१ अंगणवाडी केंद्र,माळीनगर: माळीनगर-३ अंगणवाडी केंद्र,चौडेश्वरवाडी: धनाजी निकमवस्ती अंगणवाडी केंद्र,या सर्व केंद्रांसाठी प्रत्येकी एक अंगणवाडी मदतनीस पद भरले जाणार आहे.
भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, अकलूज (ग्रामीण) येथे संपर्क साधावा, असे आवाहन बालाजी अल्लडवाड, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे







