माढ्यातील वाकाव येथे रेल्वे अंडरपासला मंजुरी; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
माढा, प्रतिनिधी : माढा तालुक्यातील वाकाव येथील रेल्वे मार्गावरील नागरिकांच्या सुरक्षित व सोयीस्कर वाहतुकीसाठी प्रस्तावित अंडरपास (सबवे) उभारण्याच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने या कामास हिरवा कंदील दिला आहे
.याबाबत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे अपर मंडल रेल प्रबंधक यांनी खासदार मोहिते-पाटील यांना पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली आहे.
वाकाव येथील रेल्वे कि.मी. 403/8-9 दरम्यान पादचाऱ्यांसाठी सबवे उभारण्याचे काम PH-16 अंतर्गत मंजूर करण्यात आले असून, या प्रकल्पाचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे
.वाकाव परिसरातील नागरिकांना रेल्वे मार्ग ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
तसेच अपघाताचा धोका कायम असल्याने सुरक्षित मार्गाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती.
या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला.अंडरपासला मंजुरी मिळाल्यामुळे वाकाव परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून, या निर्णयाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.







