*सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*-*पैलवान संग्राम कांबळे.*
अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
“कुस्तीचा विकास, खेळाडूंचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अभिमान” हे ब्रीद घेऊन सुरू झालेल्या या नव्या संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला
.कुस्ती क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि पैलवान, वस्ताद तसेच कुस्तीप्रेमींच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने या संघटनेची चळवळ सोलापूरसारख्या कुस्तीच्या भूमीतून सुरू झाल्याने सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
जिल्ह्यातील ज्येष्ठ वस्ताद, माजी व विद्यमान पैलवान, कुस्ती आयोजक आणि शौकिन यांनी संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली.
यावेळी उपस्थितांनी एकमुखाने संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शपथ घेतली. कुस्ती क्षेत्र आणि पैलवानांना भेडसावणाऱ्या विविध समस्या शासनापर्यंत ताकदीने पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र कुस्ती संघटना कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ग्रामीण आणि शहरी भागातील तळागाळातील कुस्ती क्षेत्राच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून उगम पावलेली ही नवी चळवळ निश्चितच महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात नवा अध्याय लिहिणार आहे.
ही केवळ सुरुवात असून, येत्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना मजबूत करत कुस्ती क्षेत्रासाठी एक भक्कम, पारदर्शक आणि शाश्वत व्यासपीठ उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा, पाठिंबा आणि विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व वस्ताद, पैलवान, कुस्तीप्रेमी, आयोजक आणि मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
त्यानंतर, शिंदेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे आयोजित जंगी कुस्त्यांच्या मैदानात महाराष्ट्र कुस्ती संघटनेची भूमिका, उद्दिष्टे, बांधणी आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थित वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत करून संघटनेला उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला.अशा प्रकारे, सोलापूर जिल्ह्यात नवीन कुस्ती संघटनेची मजबूत पायाभरणी करत राज्यव्यापी दौऱ्याचा सोलापूर टप्पा सर्वांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि अथक मेहनतीने दिमाखात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कुस्ती क्षेत्रातील अन्याय, गैरप्रकार आणि चुकीच्या प्रवृत्तीविरुद्ध अधिक ताकदीने आवाज उठवत, पैलवान, वस्ताद आणि कुस्तीप्रेमींच्या सन्मानासाठी महाराष्ट्र कुस्ती संघटना सदैव कार्यरत राहील, असा विश्वास श्री शाहू विजयी गंगावेश तालीम, कोल्हापूर,महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेचे पैलवान संग्राम कांबळे यांनी व्यक्त केला.
या दौऱ्यात महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पैलवान संग्राम कांबळे,उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, महाराष्ट्र चॅम्पियन अमोल आबा मदने, कल्याण केसरी आयोजक जितेंद्र भगत, कुस्ती निवेदक अशोक धोत्रे सर, पैलवान बाळासाहेब कांबळे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख चे वडील रशीद शेख, पैलवान रामदास देसाई, पैलवान सचिन वाघ इत्यादी वस्ताद पैलवान उपस्थित होते







