जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
अकलूज, (प्रतिनिधी ): दरवर्षी श्रीक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्रीक्षेत्र घुमाण (पंजाब) या देशपातळीवरील सुमारे अडीच हजार किलोमीटर सायकल वारीचे यशस्वी आयोजन करणाऱ्या सायकल रायडर्स असोसिएशन या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या माध्यमातून यंदा प्रथमच जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रविवार, ५ एप्रिल रोजी “सन डे, वन डे” या सुमारे ७५ किलोमीटरच्या एकदिवसीय माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.
भिसे म्हणाले की, संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र घुमाण (पंजाब) या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब या पाच राज्यांतून जाणाऱ्या सुमारे अडीच हजार किलोमीटर सायकल वारीचे आयोजन आम्ही दरवर्षी करतो. या २५ दिवसांच्या सायकल वारीत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सायकल रायडर्स मोठ्या संख्येने सहभागी होतात.
या सायकल वारीच्या माध्यमातून “शांती, समता व बंधुता” या संत विचारांचा प्रचार-प्रसार करण्याबरोबरच समाजात सायकलिंगबद्दल आवड निर्माण व्हावी, आरोग्य तंदुरुस्त राहावे तसेच आरोग्य, पर्यावरण व प्रबोधन या विषयांवर जनजागृती करण्याचे काम ही संघटना गेली चार वर्षे सातत्याने करत आहे
.यंदा जागतिक आरोग्य दिनानिमित्त रविवार, ५ एप्रिल रोजी अकलूज ते अकलूज अशी सुमारे ७५ किलोमीटरची सायकल राईड आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ६ वाजता अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथून मान्यवरांच्या हस्ते सायकल राईडचा शुभारंभ होणार आहे.ही सायकल राईड माळीनगर, २५/४, महाळुंग, श्रीपूर, बोरगाव, माळखांबी, बोंडले, वेळापूर, खुडूस, माळशिरस, संग्रामनगर या मार्गे सायंकाळी ४ वाजता पुन्हा अकलूज येथील क्रीडा संकुलात पोहोचेल. येथे मान्यवरांच्या हस्ते सायकल रायडर्सना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय सायकल रायडर सतीश जाधव (मुंबई) यांचे “सायकल – काळाची गरज” या विषयावर विशेष व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे. सहभागी सायकल रायडर्ससाठी प्रवासादरम्यान चहा, नाश्ता व भोजनाची मोफत सोय करण्यात आली आहे.
या एकदिवसीय सायकल राईडमध्ये १८ वर्षांवरील महिला व पुरुषांना सहभागी होता येणार आहे.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सायकल रायडर्सनी २९ मार्चपूर्वी ९८२२०२३५६४ या मोबाईल क्रमांकावर आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन भिसे यांनी केले आहे.
#SunDayOneDay#CycleRide#WorldHealthDay#HealthAwareness#CycleForHealth#CyclingIndia#Akluj#Malshiras#CyclingCommunity#RideForHealth#सायकल_राईड#आरोग्यासाठी_सायकल#जागतिक_आरोग्य_दिन#माळशिरस_सायकल_राईड#AklujCycling#CycleRidersAssociation







