माळशिरस तालुक्यात राजरोसपणे वाळू उपसा सुरु अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील नदी पात्रा शेजारी असलेल्या काही गावातून नदीच्या पात्रातून यांत्रिक बोटी च्या सहाय्याने दिवसा व रात्रीच्या वेळी रोज हजारो ब्रास बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असल्याचे चित्र आहे.
महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे.
गेल्या कित्येक महिन्यापासून नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. शासनाकडून कुठलेही टेंडर काढण्यात आलेले नसताना. बेकायदेशीर वाळूची चोरी करून शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे.
मात्र महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून व पोलिसांकडुन या वाळू माफियावर अद्याप कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नदीच्या पात्रातून हजारो ब्रास वाळूची चोरी होत असल्याचे चित्र आढळून आले आहे.
प्रांत अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत आहे.
शासनाच्या परवानगीविना रोज हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरू आहे. टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे व जे सी बी च्या मदतीने वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात असल्याचे चित्र दिसत असताना महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून यावर कुठलीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.
या वाळू उपस्या मुळे नदी काठी असलेल्या विहिरी आणि शेत जमिनीला धोका निर्माण झाला आहे. नदीच्या पात्रातून सुरू असलेला वाळू उपसा महसूल विभागाच्या व पोलिसांच्या संमतीने सुरू आहे कि काय? असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
वाळू उपशातून बक्कळ पैसा व या पैशांतून चैन तसेच खाजगी सावकारकी असे वाळू माफियांचे समीकरण आहे. त्यामुळे तालुक्यात अवैध वाळू उपशाचा व्यवसाय तेजीत आहे. सध्या चार ब्रास वाळू 20ते 30हजार रुपये दराने विकली जात आहे, मात्र त्यामुळे अवैध उपशामुळे राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
तसेच, या बेकायदा व बेसुमार उपशामुळे नद्यांमधील प्रदूषणात वाढ होत आहे.तसेच बेसुमार वाळू उपस्या मुळे नदी पात्रातील पाणी साठा कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी पाणी देखील शिल्लक राहणार नाही.
नदीच्या पात्रातून वाळू चोरी करत असलेले टिप्पर हे मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करीत आहेत. या प्रकारामुळे रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांना अपघाताचे आमंत्रण दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.
प्रशासन कारवाई करतील या भितीपोटी वाळू माफियांकडून भरधाव वेगाने वाहतूक होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
.त्याचप्रमाणे मोठया प्रमाणावर वाळू वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.याकडे महसूल विभाग, पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन हा प्रकार थांबवून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होऊ लागली आहे.
चौकट :-
माळशिरस येथे तहसीलदार म्हणून रुजू झालेनंतर आजपर्यंत एकूण आठ यांत्रिक बोटी वर कारवाई केली आहे. तसेच वाळू वाहतूक करणारी काही वाहने ताब्यात घेतली आहेत.24शेतकऱ्यांच्या 7/12उताऱ्यावर बोजा चढविण्यात आला आहे.तसेच यापुढे देखील सातत्याने कारवाई करण्यात येईल. सुरेश शेजूळ तहसीलदार. माळशिरस.







