स्वाभिमानी मराठा महासंघाचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पंढरपूरात होणार समाजाच्या विविध प्रश्नांसह आरक्षणाचा विषय असणार – शशिकांत पाटील
पंढरपूर(प्रतिनिधी):-
मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच समाजाच्या विविध प्रश्नांसह शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी मराठा महासंघाचे राज्यातील पहिले अधिवेशन पंढरपूर येथे दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी पंढरपूर होणार असल्याची माहिती स्वाभिमानी मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्षा अमृताताई पठारे, दक्षता कमिटी प्रदेशाध्यक्षा शिवशंभूप्रिया झांबरे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अलकाताई सोनवणे, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख ओंकार निंबाळकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र नाईक निंबाळकर, लहू सातपुते, अनिल बागल, लखन घाडगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना शशिकांत पाटील म्हणाले की पंढरपुरात होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वेगवेगळ्या राज्यातून मराठा, कुर्मी, पटेल, जाट, पाटीदार समाजाचे बांधव उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात मराठा आरक्षण, शेतीमालाला हमी भाव, गडकिल्ले संवर्धन, छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक यासह विविध विषयांवर विचार मंथन होणार आहे.
पंढरपुरात पार पडणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ.कृषिराज टकले-पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्य भुषण बी एन सागर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दिपक दादा पवार, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष अनिताताई पाटील, दक्षता आघाडी प्रदेश अध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे, प्रदेश कार्याध्यक्ष महिला आघाडी अमृता पठारे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा अलका ताई सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिताताई जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शशिकांत पाटील यांनी दिली.
याप्रसंगी आलेल्या सर्व स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन मराठा आरक्षण मिळावे, मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटावे आणि अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला साकडे घातले असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
अधिवेशनादरम्यान मराठा समाजाची पंढरपूरची वारी या माध्यमातून पंढरीच्या पांडुरंगाला मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी साकडं घालून मराठा समाज जोडो अभियान राबविण्यात येणार आहे.







