कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
अकलूज,( प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये कंडेन्स मिल्कला मोठी मागणी आहे.
या वाढत्या बाजारपेठेचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा आणि त्यांच्या भविष्यास आर्थिक स्थैर्य मिळावे, या उद्देशाने शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या वतीने ५० टीपीडी क्षमतेचा कंडेन्स मिल्क प्रकल्प उभारण्यात येत आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिली.
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या ५० टीपीडी क्षमतेच्या कंडेन्स मिल्क प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाला.
यावेळी खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रकल्पाची रूपरेषा आणि भविष्यातील संधी स्पष्ट केल्या.खा. मोहिते-पाटील म्हणाले, “१९७६ पासून शिवामृत दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले आहेत.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी या भागात धवलक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजसिंह मोहिते-पाटील यांनी संघाला प्रगतीच्या दिशेने नेले. आता कंडेन्स मिल्क प्रकल्पाच्या माध्यमातून शिवामृतच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे.
”या प्रकल्पातून दररोज ५० टन कंडेन्स मिल्क आणि १० टन बटर उत्पादन करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रतिदिन सुमारे २.५० लाख लिटर दुधाचे संकलन अपेक्षित आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या दुधाला अधिक मूल्य मिळण्याबरोबरच शिवामृतच्या दूध संकलनाला आणि संस्थेच्या आर्थिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे.
मूल्यवर्धित उत्पादनामुळे शेतकऱ्यांना अधिक स्थिर बाजारपेठ उपलब्ध होईल, संस्थेच्या उत्पन्नात वाढ होईल आणि परिसरात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
भविष्यात देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तार करण्याची संधीही या प्रकल्पामुळे उपलब्ध होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सहकार तत्त्वावर कंडेन्स मिल्क निर्मिती करणारा हा पहिलाच दूध संघ असल्याचे खा. मोहिते-पाटील यांनी सांगितले.
बँक ऑफ बडोदाचे रिजनल मॅनेजर राकेश सुमन म्हणाले, “मेहनत, नियोजन आणि दूरदृष्टी यांच्या जोरावरच मोठ्या प्रकल्पांची सुरुवात होते. कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक सभासदांना मोठी चालना मिळेल. रोजगारनिर्मितीसह हा प्रकल्प परिसरात आर्थिक क्रांती घडवून आणेल.”
या वेळी संघाचे मार्गदर्शक राजसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, बँक ऑफ बडोदाचे ब्रँच मॅनेजर मनीषकुमार सिन्हा, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी, नगरसेवक आणि दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.
स्वागत उपाध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख यांनी केले, तर आभार संचालक हरिश्चंद्र मगर यांनी मानले.







