अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
पंढरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात आलेला २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत, हा बोनस वाढवून किमान १० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी अॅड. बादल शामराव यादव यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांना निवेदन देऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वी सन्मानजनक आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती, घरखर्च आणि सणासुदीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात आलेले २ हजार रुपये अपुरे असून, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शासनाने बोनसच्या रकमेत वाढ करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महिला व बालविकास व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभअंगणवाडी सेविका व मदतनीस या राज्याच्या महिला व बालविकास व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. बालकांचे आरोग्य, पोषण, पूर्वप्राथमिक शिक्षण, लसीकरण मोहिमेत सहकार्य, गर्भवती व स्तनदा मातांना मार्गदर्शन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्या सातत्याने करतात
.ग्रामीण आणि शहरी भागातील बालकांचे आरोग्य व पोषण सुधारण्याबरोबरच भावी पिढीच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे.

अशा परिस्थितीत त्यांच्या मेहनतीचा आणि सामाजिक कार्याचा सन्मान राखण्यासाठी दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाला योग्य आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे अॅड. यादव यांनी म्हटले आहे
.निवेदनातील प्रमुख मागण्या
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाहीर करण्यात आलेल्या २ हजार रुपयांच्या बोनसच्या रकमेत वाढ करून किमान १० हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा. तसेच, बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा विचार करून भविष्यातही त्यांना सन्मानजनक आर्थिक लाभ मिळण्यासाठी शासनाने सकारात्मक धोरणात्मक निर्णय घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे
.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कष्टांचा योग्य सन्मान करून त्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा द्यावा आणि किमान १० हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करावा, अशी मागणी अॅड. बादल शामराव यादव यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.







