माळशिरस तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सहा महिन्यापासून मानधन पासून वंचित
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यात एकूण 174स्वस्त धान्य दुकानदार आहेत. यातील काही अपवाद वगळता बहुतांश दुकानदार हे प्रामाणिकपणे प्रत्येक महिन्यात आलेले धान्य प्रामाणिकपणे वितरण करीत असतात.एव्हढेच नव्हे तर एखाद्या सण निमित्त आलेला आनंदाचा शिधा देखील वितरण करीत असतात.
परंतु फेब्रुवारी 2024पासून आजतागायत म्हणजेच गेल्या सहा महिन्यापासून त्यांना मानधन मिळाले नाही.त्यामुळे दुकानदारां मधून नाराजी व्यक्त होत आहे.आमच्या ग्राहकांना आम्ही प्रत्येक महिन्यात प्रामाणिकपणे धान्य वितरण करतो. त्यांचा संसार सुखाचा करतो.
परंतु गेल्या सहा महिन्यापासून मानधन न मिळाल्यामुळे आमचा आणि आमच्या कुटूंबाचा कसा उदरनिर्वाह होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
वास्तविक पाहता माळशिरस तालुक्यातील अनेक दुकानदार यांचे हातावरचे पोट आहे. धान्य वितरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागतो. तो पगार कसा देणार. शिवाय कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करणार?
काही दुकानदारांनी तर आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उसणवारी करून पैसे घेतले आहेत. देणे वाढत चालले आहे.अगोदरच तुटपुंजे मानधन आहे.
त्यातच गेल्या सहा महिन्यापासून मानधन न मिळाल्यामुळे आमचे कुटूंब उघड्यावर पडले आहे.त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी विनाविलंब माळशिरस तालुका पुरवठा अधिकारी यांचेकडे गेल्या सहा महिन्यापासून थकीत असलेले मानधन जमा करावे. अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून होत आहे.







