महाराष्ट्र राज्य शासनाच्या “शासन आपल्या दारी” योजने अंतर्गत माळशिरस तालुक्यातील सुमारे २४ हजार ३२८ नागरीकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ

अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य शासनाच्या “शासन आपल्या दारी” योजने अंतर्गत माळशिरस तालुक्यातील सुमारे २४ हजार ३२८ नागरीकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला असुन,या योजनेच्या शुभारंभा प्रसंगी प्रातिनिधिक तत्वावर लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
अकलूज येथील कृष्णप्रिया मल्टीफंक्शन हाॅलमधे राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना ,सर्वसामान्यांच्या दारी या हेतूने माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होते.यावेळी आ.राम सातपुते,प्रांताधिकारी नामदेव टिळेकर,तहसिलदार अमरदिप वाकडे,गटविकास अधिकारी विनायक गुळवे, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवार ,अंगणवाडी पर्यवेक्षिका वैशाली टेके, रंजना कदम, शामल कुलकर्णी,विभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे,पंचायत समिती चे माजी उप सभापती अर्जुनसिह मोहिते पाटील,अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी,विविध खात्यांचे अधिकारी, अंगणवाडी सेविका,नागरीक बहू संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी प्रास्ताविकात प्रांताधिकारी नामदेव टिळेकर म्हणाले १३ एप्रिल रोजी राज्य शासनाने शासन आपल्या दारी योजना जाहीर करुन शासनाच्या विविध खात्यांच्या लोककल्याणकारी योजनेचा लाभ जनतेपर्यंत देण्यासाठी १५ एप्रिलला अभियान सुरु झाले.माळशिरस तालुक्यात पहील्या टप्प्यात महसुल विभागातील १२ हजार ७००, पंचायत समिती माध्यमातून ८ हजार ५४७,नगर पंचायत अकलूजच्या ५७८,तालुका कृषी कार्यालय २५२ शेतकरी व ५०० ट्रॅक्टरधारक असे एकुण २४ हजार ३२८ नागरीक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.राज्यात भाजपा-शिवसेना सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वपूर्ण अभियानांतर्गत अकलूज येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जनतेला सरकारी कार्यालयांमध्ये मारावे लागणारे हेलपाटे थांबवून एकाच छताखालीच सरकारच्या योजनांचे लाभ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारला आहे.
भाजप- शिवसेना युती सरकार हे जनतेचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून शासकीय योजना जनतेच्या दारी पोहवण्यात येत आहेत.संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, कुशल पेमेंट चे धनादेश वाटप, पशुसंवर्ध विभागाच्या अंतर्गत जनावरांना हिरव्या चाऱ्यासाठी बियाणांचे वाटप, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, कामगार सुरक्षा संच वाटप, महिला व बालविकास अंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी निवारण, बाल संगोपन योजना, बेबी केअर किट योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, बेटी बचाव बेटी पढाव योजना यासह विविध शासकीय दाखले, योजना यांची माहिती या शिबिरात अकलूजकरांना मिळाली.
यावेळी महिला बाल विकास विभाग यांचे वतीने पौष्टिक आहारा चे प्रदर्शन करण्यात आले होते.

याप्रसंगी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले केंद्र व राज्य शासनाने शेतकरी,महिला,युवक,सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवुन शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना चा लाभ देण्यासाठी प्रशासन आपल्या दारी आणण्याचे मोठे काम केले आहे.माळशिरस तालुक्यात वीजेसाठी २०० डिपी साठी ८० कोटी निधीची मागणी केली आहे. तसेच जलशिवार योजनेच्या दुस-या टप्प्यात माळशिरस तालुक्यातील ७० गावे समाविष्ट करण्यात आले असुन, कामांना सुरवात झाली असल्याचे सांगितले.यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर,आ.राम सातपुते यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रातील आणी राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेचे हेलपाटे वाचावेत हेतुने जनतेपर्यंत शासकीय योजनांचा थेट लाभ देत असल्याने पारदर्शी कारभार होत असुन रस्ते,घरे,वीज,पाणी,आरोग्य या मुलभूत गरजा बरोबरच तंत्रज्ञान,इन्फ्रास्ट्रक्चर सारखी अधुनिक योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचत असल्याचे सांगितले.







