छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत पाटील यांचा अकलूज येथे यथोचित सन्मान

अकलूज (प्रतिनिधी )1981 ते2000 या दोन दशकातील भारतीय व महाराष्ट्र कबड्डी संघाचे 5 वेळा उत्कृष्ठ कॅप्टन पद भूषविलेले तसेच कोच व 1989चे छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत पाटील हे आपल्या कामानिमित्त अकलूज येथे आले असता त्यांचा यथोचित सन्मान एल डी बाबर सर व हनुमंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.कबड्डी स्पर्धेतील सूर्यकांत पाटील या जिगरबाज खेळाडूच्या ‘हनुमान’ उडीने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि परदेशातही दबदबा निर्माण केला आहे. त्यांची ही कामगिरी थरारक तर आहेच, पण देशासाठी अभिमानाची बाब आहे.सूर्यकांत पाटील… सलग सात राष्ट्रीय स्पर्धा आणि तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होणारा आणि हनुमान उडीसाठी प्रसिद्ध असणारा कबड्डीपटू या खेळात प्रत्येक नावजलेल्या खेळाडूचे एक आगळेवेगळे अस्तित्व आहे. कोणी चढाईसाठी, कोणी पकडीसाठी, कोणी बैठी तर कोणी उंच लाथ मारण्यात वाकबगार आहेत. सहा-सहा फूट उंच उडी मारून हमखास गुण मिळविणारा सूर्यकांत हा एकमेव आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खेळाडू आहे. यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. खरे तर सूर्यकांत पाटीलची गुणवत्ता सांगलीकरांना ओळखताच आली नाही. तेथील जिल्हा संघातही स्थान नसल्याने सूर्यकांत पाटीलने पुण्याचा रस्ता धरला आणि पुण्यातच आपली कारकीर्द घडवून कबड्डीतील ‘हनुमान’ असा आपला आगळावेगळा दबदबा निर्माण केला. तो चढाईला आला की प्रतिस्पर्धी संघात धडकीच भरायची. साखळी लावून त्याला पकडायचा प्रयत्न केला, की हा पठ्ठा खेळाडूंच्या डोक्यावरून झेप घेत तीनचार खेळाडू हमखास बाद करायचा. त्याला पकडायचे कसे हा यक्ष प्रश्न प्रतिस्पर्धी संघासमोर उभा रहायचा. त्याच्या उंच उडी मारण्याच्या क्षमतेला मर्यादा नसायच्या. पंजाबच्या शिवदेव सिंग या ६ फूट २ इंच उंचीच्या खेळाडूच्या डोक्यावरूनही तो सहजतेने उडी मारायचा. १९८३ पासून ते थेट आजपर्यंत सूर्यकांतने उंच उडीचा ठसा उमटविलेला आहे. या असामान्य क्षमतेने भारतातलेच नव्हे, तर रशिया, पाकिस्तानचेही खेळाडू चकित झालेले आहेत. सलग १५ वर्षे तो पुण्यातून आणि नोकरी करीत असलेल्या महाराष्ट्र बँकेकडून खेळत आहे. १९८९ मध्ये छत्रपती पुरस्कार देऊन राज्य सरकारने त्याच्या या गुणवत्तेची कदर केलेली आहे.वडील, काका, आजोबा, पंणजोबा असे सर्वचजण कुस्तीगीर होते. त्यामुळे बालपणापासूनच त्याच्यावर क्रीडा संस्कार झाले. वडील तर लष्करात असल्याने अगदी बालवयापासून त्याच्याकडून व्यायाम करून घेत असत. सूर्यकांतचे शरीर तेथूनच बळकट होत गेले. संपूर्ण खानदान कुस्तीत असले तरी सूर्यकांतला आवड होती ती कबड्डीची. म्हणूनच त्याने कुस्तीऐवजी कबड्डीचा मार्ग धरला. पुण्यात आल्यानंतर पहिली राष्ट्रीय स्पर्धा १९८३ मध्ये तो खेळला. महाराष्ट्र संघात स्थान मिळाल्यानंतर सलग सात वर्षे त्याने आपले स्थान कायम ठेवले होते. विशाखापट्टणम येथे फेडरेशन करंडक स्पर्धेत त्याची ‘हनुमान उडी’ फारच गाजली. केवळ या उडीमुळे सूर्यकांतची भारतीय संघात निवड झाली. १९८७ मध्ये जर्मनीत १९८८ मध्ये पाकिस्तानमध्ये आणि १९८९ मध्ये जयपुर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत तो भारतातर्फे खेळला. त्रिचनगूड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आणि मनमाड येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे नेतृत्वही केलेले आहे.







