गिरझणी ते संग्रामनगर रस्त्याची दुरावस्था रस्त्यावर डांबरीकरण कधी होणार?.
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील गिरझणी ते संग्रामनगर या चार किलोमीटर रस्त्याचे उदघाटन 28-12-2021रोजी लोकप्रतिनिधी व स्थानिक नेतेमंडळी यांच्या हस्ते झाले होते.तसेच या रस्त्याचे एकूण इस्टीमेट 2कोटी 55लक्ष इतके असून नियोजित काम 27-12-2022पर्यंत पूर्ण करायचे होते.तसेच 5वर्षाच्या देखभाल दुरुस्ती साठी 17लाख 41हजार रु. एव्हढे एस्टीमेटे आहे.परंतु प्रत्यक्षात मात्र उदघाटन झाल्यानंतर हे काम ऑगस्ट, सप्टेंबर 2022मध्ये सुरु करण्यात आले.आमदार रणजितसिंह मोहीते-पाटील यांनी 2फेब्रुवारी रोजी यशवंतनगर येथे माळशिरस तालूक्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये वीज, पाणी, बंधारे, गटारी, रस्ते, रेशन कार्ड असे नागरीकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले.या बैठकीत गिरझणी ग्रामपंचायतीच्या नागरीकांनी गिरझणी ते संग्रामनगर या रस्त्याचे काम सुरू होऊन आता मुदत संपली आहे. पण रस्त्यावर पक्त खडीच पडली डांबरीकरण मात्र झाले नाही. अशी तक्रार करताच आ. मोहिते-पाटील यांनी लगेच ठेकेदाराला उभा करून कारण विचारले असता,सध्या खडी उपलब्ध नाही. खडी उपलब्ध झाली की कामाला सुरूवात करतो असे उत्तर मिळाले. यापूर्वी ठेकेदार यांना रस्त्याच्या कामासंदर्भात विचारणा केली होती. त्यावेळेस लिक्विड नाही. असे सांगण्यात आले होते.सदर काम हे ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या अर्थसहाय्याने कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, सोलापूर यांचे वतीने मे. शिवमल्हार कॅन्स्ट्रक्शन कंपनी सातारा यांनी केले आहे.परंतु अवघ्या काही महिन्यापूर्वी केलेल्या या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, ठिकठिकाणी खडी उचकटून रस्त्यावर आली आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या टू व्हीलर, फोर व्हीलर वाहनांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयात जाणारे लहान मुले, मुली यांना याच रस्त्यावरून सायकल वर प्रवास करावा लागतो. तसेच अनेक मुले, वयोवृद्ध नागरिक या रस्त्यावरून पायी ये -जा करीत असतात.या रस्त्यावरून एखादी टू व्हीलर अथवा फोर व्हीलर जात असताना रस्त्यावर उचकटून वर आलेली खडी उडून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या इतर नागरिकांच्या अंगावर उडून लागत आहे. त्यामुळे या खडी मुळे एखाद्याला डोळ्याला अथवा अंगाला खडी लागल्यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धुळीचा देखील ये -जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.याच रस्त्यावर अकलूज क्रिटिकल केअर हॉस्पिटल असून, या रस्त्याने उपचारासाठी अनेक रुग्ण येत असतात. तसेच सध्या ऊस कारखाने सुरु असून, या रस्त्याने ऊस वाहतूक करणारी वाहने, बैलगाडी देखील ये -जा करीत असतात.त्याचप्रमाणे या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी अनेक नागरिक मुले व्यायाम करण्यासाठी ये -जा करीत असतात.या रस्त्यावरील मोठ -मोठी खडी उचकटून वर आल्यामुळे ही खडी अंगावर उडून नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच हा रस्ता मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने घाईगडबडीत काम उरकल्याने सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्यामुळे खडी उचकटून वर आली आहे.त्याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे.या रस्त्याच्या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी. अशी मागणी गिरझणी, संग्रामनगर येथील नागरिकांमधून होत आहे.












