*मुकनायकच्या माध्यमातून झालेला परिसंवाद समाजाला दिशादर्शक ठरेल – भीमराव आंबेडकर*
संग्रामनगर दि.५ (केदार लोहकरे यांजकडून)सामान्य माणसाला चालना देण्यासाठी महत्वाच्या विषयाचे गांभीर्य समाजापुढे आणण्यासाठी देशातील व राज्यातील मिडीया कमी पडत आहे त्यामुळे ‘मुकनायक’ च्या 103 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेला परिसंवाद समाजाला दिशादर्शक ठरेल असा आशावाद भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘मुकनायक’ या पहिल्या वृत्तपत्राच्या 103 व्या वर्धापनदिनानिमित्त मुकनायक परिसंवाद कृती समितीच्या वतीने अकलूज येथे आयोजित ‘मुकनायक परिसंवाद’ कार्यकमात भीमराव आंबेडकर बोलत होते.यावेळी बार्टीचे माजी विभाग प्रमुख व पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सत्यंद्र चव्हाण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, भंते बी सारिपुत्त उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.भीमराव आंबेडकर म्हणाले,वंचित,पिडीत, दलीत लोकांच्या अन्यायाला वाचा फोडणारे स्वतंत्र वृत्तपत्र असावे असा विचार 100 वर्षापूर्वी करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 29 व्या वर्षी मुकनायक वृत्तपत्र सुरू केले आणि त्याच्या माध्यमातून लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकार सांगितले. बाबासाहेबांनी वृत्तपत्राला राजकीय स्वरूप दिलं असतं तर कदादिच वंचितांचं चित्र वेगळं दिसलं असतं. डॉ.सत्येंद्र चव्हाण यांनी ऐतिहासिक संदर्भ देऊन महारांचा लष्करी व सांस्कृतिक इतिहास तसेच कोरेगांव भीमा संघर्षाची सांगितलेली उदाहरणे उपस्थितांसाठी रोमांचकारी ठरली.त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजून घेऊन तो इतरांना सांगता येण्यासाठी वाचन महत्वाचे असल्याचे सांगतानाच अधिकारी वर्गाने समाजाला दिशा देण्याचे काम करण्याचे आवाहन केले.तसेच तरूणांनी इतिहास समजून घेण्याबरोबरच उद्योगधंदे वाढवून आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असल्याचेही सत्येंद्र चव्हाण यांनी सांगितले. धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले,साक्षरतेचे प्रमाण केवळ 3 टक्के असताना चावडीवर बसून सुशिक्षीत नागरीक वृत्तपत्राच्या माध्यमातून अशिक्षीतांना जागृत करतील या हेतूने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केले ही फार मोठी गोष्ट आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यांच्या शिकवणीला समाजातील सर्व घटकांनी पायीक राहणे गरजेचे असल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले. यावेळी मुकनायक परिसंवाद कृती समितीच्या वतीने पत्रकारीतेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दैनिक लोकमत चे राजीव लोहकरे व मॅक्स महाराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी अशोक कांबळे यांना मुकनायक सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.परिसंवादाच्या अगोदर प्रसिध्द गायक विजय सरतापे यांनी गायलेल्या भीमगितांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. *चौकट**सुमारे 1 लाख 77 हजार रूपयांच्या पुस्तकांची विक्री :*मुकनायक परिसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या लहान,थोर, ज्येष्ठ व विशेष करून महिला वर्गाने पुस्तक खरेदीसाठी भरघोस प्रतिसाद दिला. परिसंवाद स्थळी उभारण्यात आलेल्या पुणे येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संस्थेच्या, बारामती येथील महेंद्र गायकवाड व लवंग येथील दत्तात्रय जाधव यांच्या पुस्तकांच्या स्टॉलच्या माध्यमातून एकूण सुमारे 1 लाख 77 हजार रूपयांच्या पुस्तकांची विक्री करण्यात आली.







