मध्यप्रदेश सरकारच्या लोकरंग महोत्सवात महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त समाजातील ४० कलाकारांची निवड माळशिरस तालुक्यातील आठ जणांचा समावेश
अकलूज / प्रतिनिधी – मध्यप्रदेश सरकारच्या जनजातीय लोककला आणि बोलीभाषा विकास अकादमीच्या वतीने भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या लोकरंग महोत्सव २०२३ साठी महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त समाजातील सुमारे ४० कलाकारांची निवड करण्यात आली असून या महोत्सवात माळशिरस तालुक्यातील आठ कलाकारांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती विमुक्त घुमंतु विकास मंचचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली आहे .मध्यप्रदेश सरकारच्या जनजातीय लोककला आणि बोलीभाषा विकास अकादमीच्या वतीने गुरुवार दि . २६ जानेवारी ते सोमवार दि . ३० जानेवारी २०२३ दरम्यान रवींद्र भवन , भोपाळ येथे आझादी का अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे . या निमित्त राष्ट्रीयस्तरावरील भटक्या विमुक्त समाजातील लोककलावंतांच्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे या हेतूने लोकरंग महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे . या महोत्सवात काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान वास्तव्यास असलेल्या देशभरातील भटक्या विमुक्त कलाकारांच्या लोककलेचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे . या महोत्सवात देशातील भटक्या विमुक्त समाजाच्या लोककला , त्यांनी निर्माण केलेले लोकसाहित्य , विविध प्रकारच्या कलाकृती , वस्तू आदींचे प्रदर्शन मांडले जाणार आहेत . या महोत्सवात देशभरातील भटक्या विमुक्त समाजातील सुमारे एक हजार कलाकार सहभागी होणार आहेत . या कलाकारांची शासनाच्या वतीने प्रवास , निवास , भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात आली असून या महोत्सवात सहभागी कलाकारांना शासनाच्या वतीने प्रमाणपत्र व मानधन दिले जाणार आहे . माळशिरस तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजाचे अभ्यासक सूर्यकांत भगवान भिसे , चंद्रकला सूर्यकांत भिसे , कुडमुडे जोशी समाजाचे शहाजी आनंदा मोरे , नाना आनंदा मोरे ( सर्व रा . वेळापूर जि सोलापूर ) देउळवाले समाजाचे बाळू वामन चव्हाण , विष्णू आण्णा चव्हाण , मंगल आण्णा चव्हाण , तात्या सुरेश देवकर ( सर्व रा . अकलूज जि सोलापूर ) या कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे . महाराष्ट्रातील कलंदर समाजातील सलीम सय्यद , सिकंदर रज्जाक सय्यद , अल्ली बशीर सय्यद , रहिमान बाशा सय्यद , शाहरुख मुन्ना सय्यद सर्व रा . आष्टी जि . बीड ) गोंधळी समाजातील प्रल्हाद अंबादास नरवडे , सतीश विजयकुमार नरवडे , उत्तम तुकाराम नरवडे , बालाजी अंबादास नरवडे , अशोक तुकाराम नरवडे , सुभाष बापूराव सोनवणे , जीवन अरुण सोनवणे व मदन तुकाराम नरवडे ( सर्व रा . परभणी ) भटक्या विमुक्तांचे अभ्यासक डॉ श्रीकृष्ण काकडे ( अकोला ) यांच्या नेतृत्वाखाली नंदीवाले समाजाचे संदीप विश्वनाथ सुरुडकर , अशोक विश्वनाथ सुरुडकर , निलेश पाकदुने ( सर्व रा . घानमोड जि बुलढाणा ) , ओतारी समाजाचे छबीलाल दयाराम उईके , राजकुमार ताम्रकार , गजानन सुरजीप्रसाद नैताम ( सर्व रा धानोरा जि गडचिरोली ) , वासुदेव समाजाचे प्रल्हाद अबाजी कद्रे , भारत राजाराम कद्रे , रामभाऊ सखाराम घोगरे , लक्ष्मण चंद्रभान कानडे ( सर्व रा औंढा नागनाथ जि . हिंगोली ) , स्मशानजोगी समाजाचे गंगाराम यल्लप्पा घनसरवाड , अंकुश गंगाराम घनसरवाड , चांदू रामा घनसरवाड , गंगाधर शेषराव इरेवाड , राधेश्याम हनुमंत ठपेवाड (सर्व रा दारव्हा जि यवतमाळ ) या कलाकारांची लोकरंग महोत्सव २०२३ साठी निवड करण्यात आली आहे .








