महिलांचीही महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु करुन पहिली स्पर्धा अकलुजला भरविण्याची संधी मिळावी-सौ.शितलदेवी मोहिते-पाटील
अकलुज(प्रतिनिधी )पुरुषांप्रमाणेच महिला देखील कुस्ती क्षेत्रात कारकिर्द घडविण्याच्या विचारात आहेत.त्यातुनच महिलांचा कुस्तीकडे मोठ्या प्रमाणात कल वाढत आहे . महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महीला खेळाडूंना कुस्ती क्षेत्रात उत्तम प्लॅटफॉर्म मिळेल.म्हणुन पुरुषांप्रमाणेच महिलांचीही महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु करुन केसरी स्पर्धा भरविण्याची पहिली संधी अकलुजला मिळावी. अशी मागणी अकलुज येथील ताराराणी महिला प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षा शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेचे अध्यक्ष खा.रामदास तडस यांचेकडे केली आहे.शितलदेवी मोहिते-पाटील यांनी आपल्या निवेदनामध्ये महिलांच्या महाराष्ट्र केसरी संदर्भात मागणी करताना म्हटले आहे की,महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेला १९६१ पासून सुरुवात झाल्यानंतर दरवर्षी या स्पर्धेच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली. पुरुषांच्या कुस्तीप्रमाणे आता महिलांची कुस्तीही तितकीच जोर धरत आहे. कुस्तीकडे वळणाऱ्या मुलींच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. पुरुषांप्रमाणेच राज्यातील महिलादेखील मोठय़ा प्रमाणात कुस्तीमध्ये कारकीर्द घडवण्याचा गांभीर्याने विचार करीत आहेत.महाराष्ट्रातील विविध ठिकाणी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत, त्यामधून महीला कुस्ती खेळाडूंचे प्रमाण वाढत चाललेले आहे. या खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याकरिता व राज्यपातळीवर एका दर्जेदार स्पर्धेची गरज आहे, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महीला खेळाडूंना उत्तम प्लॅटफॉर्म मिळेल.महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली तर महाराष्ट्रातील अनेक महिला खेळाडू आपली कामगिरी सिद्ध करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पदके मिळवून देऊ शकतील. गेली काही वर्षे सुरू असणाऱ्या प्रो कुस्ती लीगमध्ये महिलांनाही समाविष्ट करून घेण्यात येत आहे. काही वर्षापूर्वी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला बऱ्यापैकी प्रेक्षकांचे प्रोत्साहनही लाभले. मात्र तरीही महिलांसाठी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा अजून स्वतंत्रपणे सुरू झालेली नाही.राज्य कुस्तीगीर परिषदेकडे गेल्या पाच वर्षापासून आम्ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या म्हणून पाठपुरावा करीत आहोत, सन २०२० साली कुस्तीगीर परीषदेचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार व सचिव बाळासाहेब लांडगे यांच्याकडे महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्याव्यात म्हणून पत्रव्यवहार केला मात्र त्यांच्याकडून दखल घेतली नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.पुणे येथे पार पडलेल्या यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू करण्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाला प्रतिसाद द्यावा. व आम्हाला अकलूज येथे पहील्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्यास संधी द्यावी. अशी विनंती ताराराणी महिला प्रशिक्षण केंद्र अकलूज च्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांनी आपल्या निवेदनात केली आहे.







