पंचांनी चुकीचे गुण दिले नसते. तर मी महाराष्ट्र केसरी झालो असतो.पुढील वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणारच- पै.सिकंदर शेख
अकलूज (प्रतिनिधी )नुकतीच पुणे येथे 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत पुणे चा शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी झाला. तर महेंद्र गायकवाड हा उप महाराष्ट्र केसरी ठरला. परंतु ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पै. सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी चा प्रबळ दावेदार मानला जात होता. सोशल मीडिया वर सर्वत्र अशीच चर्चा होती.परंतु या स्पर्धेत पै. महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मारुती सातव हे पंच होते. या सामन्यातील पराभवामुळे सिकंदर शेखला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर आता पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन आल्याची चर्चा सुरु आहे, मात्र ही धमकी नसून केवळ प्रश्न असल्याचे खुद्द सिकंदर शेख याने सांगितले. सिकंदर शेख याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. यात त्याने माझ्यावर अन्याय झाला आहे, असेही सिकंदर शेख म्हणाला.पुढच्या वर्षी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होणार आहे. त्यावेळी ती गदा मी जिंकणारच असा ठाम आत्मविश्वास त्याने व्यक्त केला आहे. सिकंदर म्हणाला “मागील खूप दिवसांपासून आमची तालीम महाराष्ट्र केसरीच्या गदेची वाट पाहत आहे. मी नक्कीच पुढच्या वर्षी कोल्हापूरात महाराष्ट्र केसरीची गदा आणेन. पंच मारूती सातव यांना धमकी नसून फक्त विचारणा केली आहे. तसेच पैलवान संग्राम कांबळेंनी पंचांना फक्त प्रश्न विचारला असे सिकंदरने म्हटले आहे.सदर व्हिडीओ मध्ये सिकंदर पुढे बोलताना म्हणाला,’माझ्यावर अन्याय झाला का नाही हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे. इथं सर्वाना कुस्ती कळते.भारतातील, महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमिनी माझ्यावर जे प्रेम दाखवल ते असंच राहूद्या. काल तुम्ही माझ्यासाठी रडला. पण एक दिवस मी तुम्हाला महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून दाखवेन’.दरम्यान, सिकंदर शेखने पंचांच्या निर्णयावर देखील मत व्यक्त केलं आहे. सिकंदर शेख म्हणाला, “जिथे टांग लागली तिथे परफेक्ट टांग लागली नव्हती, पण त्याची (महेंद्र गायकवाड) ॲक्शन होती. म्हणून त्याला 2 गुण द्यायला पाहिजे होते. तसेच माझी पूर्णपणे पकड होती म्हणून मला 1 गुण द्यायला हवा होता. अशी 4-3 ने कुस्ती चालायला हवी होती. तिथे 2 गुण द्यायला हवे होते तिथे 4 गुण देण्यात आले. वरून पूर्णपणे खाली पडल्यावर 4 गुण दिले जातात पण तसे झाले नाही. माझ्या प्रशिक्षकांनी दाद मागितली पण त्यांना तिथून हाकलून दिले. मी पूर्णपणे तयारी केली होती.त्यामुळे मी महाराष्ट्र केसरी झालो असतो. पण तसे झाले नाही हे सर्व थांबले पाहिजे.”अशीही खंत पै. सिकंदर शेख याने व्यक्त केली आहे.









