*भावाला दिर्घायुष्य लाभण्यासाठी बहिणीने स्वतःची किडनी दान करून भाऊ बहिणीचे जपले नाते.*
संग्रामनगर दि.११ (केदार लोहकरे यांजकडून)भाऊ व बहीणीचे एक अतूट नाते असते याची प्रचिती माळशिरस तालुक्यातील चाकोरे गावातील प्रतापनगर येथील अंगणवाडी सेविका संगीता कोळेकर यांनी आपल्या लहान भावाच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यामुळे आपली एक किडनी भावाला दान करून बहिणीचे कर्तव्य निभावले आहे.पुणे येथे जहाँगीर हाॅस्पीटल या ठिकाणी या दोघांची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. पुणे येथे मॅकेनिकल इंजिनिअर असलेला धाकटा भाऊ म्हाकू मारूती विरकर (वय ३२) यांच्या दोन्ही ही किडन्या लहान वयातच खराब झाल्यामुळे त्याला एका किडनीची अत्यंत आवश्यकता होती.अंगणवाडी सेविका असलेल्या संगीता कोळेकर (वय ४२) यांनी वेळेचा विलंब न करता त्यांनी आपली एक किडनी भावाला देवून एका बहिणीचे कर्तव्य तर पार पडलेच पण त्याच बरोबर भावाचा जीव वाचवला आहे.भावाला दिर्घायुष्य लाभावे यासाठी बहिणीने दातृत्वाचे काम केले आहे. श्रीमती संगीता कोळेकर या गेली २५ वर्ष चाकोरे येथील अंगणवाडीत सेविका पदावर कार्यरत आहेत.दहा वर्षापुर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले असून त्या दिवसापासून त्या एकट्या व त्यांच्या सासू संसाराचा गाडा ओढत आहेत.त्यांना तीन मुली व एक मुलगा असून तीन ही मुली कृषी महाविद्यालयाच्या पदवी प्राप्त केली आहे.श्रीमती कोळेकर यांना भावाला किडनी दिल्यामुळे त्याचा त्यांना आनंद तर झालाच पण आई वडिलांच्या चहे-यावरच्या आनंदाने त्या खूप समाधानी आहेत.







