माळशिरस ते पिलीव रस्त्यासाठी आ. राम सातपुते यांच्या प्रयत्नामुळे 24 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
अकलूज:(प्रतिनिधी )
माळशिरसचे आ. राम सातपुते यांनी माळशिरस तरंगफळ मार्गे पिलीव या रस्त्यासाठी गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु हा निधी अपुरा पडत असल्याने या रस्त्याचे काम रखडले होते. ही बाब स्थानिकांनी आ. राम सातपुते यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सध्याच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात याच निधीमध्ये अजून 10 कोटींचा वाढीव निधी देऊन एकूण 24 कोटी रुपयांचा निधी माळशिरस पिलीव या रस्त्याला आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून मिळाल्याने या रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
माळशिरस तालुक्याच्या दक्षिण भागातील शेवटच्या गावांमधील पिलीव हे एक महत्त्वपूर्ण गाव असून,सातारा पंढरपूर रस्त्यावर असणाऱ्या या गावास आसपासची आठ-दहा खेडी जोडली असून पिलीव ही एक माळशिरस तालुक्याच्या दक्षिण भागातील एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ समजली जाते. माळशिरस या तालुक्याच्या ठिकाणाहून पिलीवला जाण्यासाठी तरंगफळ मार्गे असणारा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला असून,दळणवळणासाठी व विद्यार्थ्यांसाठी ये -जा करताना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खराब रस्त्यामुळे वाहतुकीस अनेक अडथळे निर्माण होत होते.याच मार्गावर अनेकदा अपघात झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने स्थानिक प्रयत्न करत होते.परंतु गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.राम सातपुते यांना या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत निवेदन देण्यात आले होते.
यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ राम सातपुते यांनी या रस्त्यासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.परंतु हा निधी अपुरा पडत असल्याने या रस्त्याचे काम रखडले गेले पुन्हा एकदा आ राम सातपुते यांच्याकडे तक्रार करण्यात आली. व या तक्रारीच्या अनुषंगाने नागपूर येथील सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आ राम सातपुते यांनी या रस्त्यासाठी पुन्हा एकदा 10 कोटींचा वाढीव निधी दिला असून,एकूण या रस्त्याच्या कामासाठी 24 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने या रस्त्याचे काम सुरळीत सुरू होणार आहे .
चौकट :-
माळशिरस ते पिलिव या 23 की मी च्या रस्त्यासाठी प्रथमता 14 कोटी रुपये मंजूर झाले होते.परंतु,या निधीत हा रस्ता फक्त चांदापुरी पर्यंतच करता येत होता. यामध्ये आ. राम सातपुते यांनी 10 कोटी रुपयांचा वाढीव निधी दिल्याने हा रस्ता पूर्णपणे होणार असून, फेब्रुवारी 2023 मध्ये या कामास सुरुवात होऊन हे काम एका वर्षभरात पूर्ण होणार आहे .
निरंजन तेलंग ,कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग अकलूज







