नगरपंचायत , बायपास करण्यास विरोध केल्याने वेळापूरचा विकास खुंटला : धैर्यशील मोहिते पाटील
अकलूज / प्रतिनिधी – गेली १५ वर्षे ज्यांच्या हातात सत्ता होती . त्यांनी वेळापूर नगरपंचायत करण्यास , बायपास करण्यास विरोध केला . त्यामुळेच वेळापूरचा विकास खुंटला असे मत भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले . वेळापूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने श्री अर्धनारीनटेश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत मोहिते पाटील बोलत होते . मोहिते पाटील म्हणाले , प्रत्येक वेळी भूलथापा देवून विरोधकांनी सत्ता मिळविली . १५ वर्षात जातीजातीत , समाजासमाजात भांडणे लावली . जसा पांडवाने बकासुराचा बळी घेतला तसा वेळापूरकरांनी मतदानाच्या रुपाने गावाला गिळंकृत करणाऱ्या बकासुराला संपवावे असे आवाहन करुन जिल्हा परिषद , पंचायत समिती , विधानसभा व लोकसभेला साथ देणाऱ्या वेळापूरकरांनी यंदाच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाला साथ द्यावी . आपण विकासाची गंगा घराघरात पोहोचवू . वेळापूर गावची नगरपंचायत करु , रस्ते , विज , पाणी आदी प्रश्न सोडवू असे ते म्हणाले . या प्रचार सांगता सभेत शेतकरी संघटनेचे गोपाळराव घाडगे , गणेश चव्हाण , चेअरमन अमरसिंह माने देशमुख , सभापती सतीशराव माने देशमुख यांनी रस्ते , पाणी , विज , बायपास आदी प्रश्न मांडून गेल्या १५ वर्षात गावच्या विकासाला खीळ बसल्याचे सांगितले . या सभेत शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख , अमर माने देशमुख , गोपाळराव घाडगे यांनी पाठींबा दिला तर इसाक पठाण , अरुण मदने , रामराजे माने देशमुख व सतीश धोत्रे यांनी मोहिते पाटील गटात प्रवेश केला . या सभेस सहकार महर्षी कारखान्याचे संचालक शंकरराव माने देशमुख , महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख , महादेव ताटे , आनंदराव माने देशमुख , रेणुका माने देशमुख , निलम माने देशमुख यांच्यासह उमेदवार उपस्थित होते . आभार माजी उपसरपंच शंकरराव काकुळे यांनी मानले .







