*सयाजीराजे पार्कमध्ये स्थानिक पक्ष्यांची मांदियाळी**सयाजीराजे पार्क येथे स्थानिक पक्ष्यांचा किलबिलाट**सयाजीराजे पार्क नानाविध पक्ष्यांच्या गर्दीने गजबजले**(स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन प्रतीक्षेत)*
अकलूज: आपल्या निसर्ग सौंदर्याने पर्यटकांवर भुरळ घालणारे येथील सयाजीराजे पार्क सध्या स्थानिक पक्ष्यांची गर्दीने पर्यटकांचे लक्ष वेधत आहे. दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करून येणाऱ्या पाहुणे पक्ष्यांनी मात्र आपले आगमन यंदा लांबणीवर टाकले आहे. पार्कमधील पाणवठ्याच्या काठावर असलेल्या विविध महाकाय झाडांचा आश्रय घेत व अंतर्गत पदपथाच्या दुतर्फा लावलेल्या शोभिवंत झुडपांचा सहारा घेत स्थानिक पक्षी विहार करताना नजरेस पडतात. पार्क परिसरात पसरलेले विस्तृत पाणलोट क्षेत्र व त्याच्या काठावर असलेल्या विविध भारतीय मूळ वृक्ष तसेच पार्क सुशोभिकरणासाठी लावण्यात आली शोभिवंत झुडुपे इथे वास्तव्याला असणाऱ्या पक्ष्यांसाठी सुरक्षितपणे वावरायला पोषक ठरतात. *पार्कमध्ये सध्या गर्दी केलेले स्थानिक पक्षी*रातबगळे, हळदीकुंकू बदक, पाणकावळे, राखी धनेश, वेडा राघू, शिंपी, राखी वटवट्या, होला, कोतवाल, कोकीळ, खंड्या (अबलख व छोटा खंड्या ), धीवर पक्षी, गावकावळे, डोमकावळे, चष्मेवाला, सुभग, सूर्यपक्षी, दयाळ, हळद्या, लावाव्या टिटवी, मुनिया, लालबुड्या, साळुंकी, पारवा, रामगंगा, ब्राह्मणी मैना, काळी घार, ब्राह्मणी घार, बहिरी ससाणे, कापशी घार, काळे व पांढरे कुदळ्या, राखी बगळा, छोटा व मध्यम बगळा, शेकाट्या, वंचक, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी. पाळीव हंस पक्ष्यांचा एक मोठा थवा, हळदीकुंकू बदकांबरोबर पाणपृष्ठावर मनसोक्त तरंगताना पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. *आपले आगमन लांबणीवर टाकलेले स्थलांतरित पक्षी:*ब्राह्मणी बदक, पक्षी बदक (शाॅव्हलर), नकटा बदक (नाकेर), धोबी, नदीसुरय, थिरथिरा (कंपनपक्षी), चित्रबलाक व मधूबाज *रातबगळ्यांचा जिल्ह्यातील मोठा अधिवास पार्कमध्ये.*पाळीव जनावरांना त्रासदायक ठरणाऱ्या गोचीडांना लक्ष्य करणारे रातबगळे या पक्ष्यांचा समूह पार्कच्या घनदाट झाडांच्या आडोशाला आहेत. रात्रभर उदर निर्वाह करून दिवसभर विश्रांती घेत हे निशाचर पक्षी दरवर्षी उन्हाळ्यात आपल्या संतानोत्पत्तीत गर्क असतात. शेतकऱ्यांना परोपकारी असलेले हे बगळे तीस ते चाळीस संख्येने या ठिकाणी वास्तव्यास आहेत.
चौकट: –
सुमारे पंचवीस एकर परिसरात मुबलक पाणी व प्रचंड वृक्षराजीने नटलेले पार्क निर्मातीपासून केवळ पर्यटकच नव्हे तर देशी व विदेशी पक्ष्यानांही आकर्षण केंद्र बनले आहे. वर्षभर या ठिकाणी नाना प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. हिवाळ्यात या ठिकाणी वीसेक प्रकारचे दूरवरून स्थलांतर करून येणऱ्या पक्ष्यांचीही नोंद दरवर्षी आहे.
स्वरूपाराणी मोहिते -पाटील, व्यवस्थापिका, सयाजीराजे पार्क, आनंदनगर – अकलूज
चौकट: –
या वर्षीच्या ऋतू बदलाच्या वातावरणातील अस्थिर वातावरणाचा परिणाम ऋतुचक्रावर झाल्यामुळे पार्क परिसरात नेहमी येणारे विदेशी पक्षी अद्याप आले नाहीत. आता थंडी वाढत चालली असून वातावरण स्थिरावेल व विदेशी पक्षी याठिकाणी येथील असा अंदाज आहे. स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाचे संदेश देणारे शेकाट्या पक्षी आल्यामुळे त्यापाठोपाठ इतर पाहुणे पक्षी येतील अशी खात्री आहे
. डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक













