अकलूज : पर्यावरणाची होणारी हानी, वाढते प्रदुषण याचा प्रामुख्याने विचार करून नागरीकांच्या वेळेची व पैशाची बचत होण्याच्या दृष्टीकोनातून अकलूजमधील हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी आता सरपनाविना होणार आहे. या करिता येथे गॅस दाहिनी बसवण्यास येणार असून त्यासाठी तब्बल 1 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम मार्गी लागणार आहे.झाडे लावा, झाडे जगवा या पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या संदेशाला मुर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न अकलूज नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे. अंत्यविधीसाठी लागणारे सरपन व सरपनासाठी होणारी झाडांची कत्तल थांबविण्यासाठी नगरपरिषदेने उचललेले हे एक पाऊलच म्हणावे लागेल. याशिवाय उभारण्यात येणार्या गॅस वाहिनीमुळे येथे अंत्यविधीसाठी येणार्या नागरीकांच्या वेळेची व पैशाचीही बचत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.गॅस दाहिनी बाबत महर्षि डिजीटल न्यूज बरोबर बोलताना गस्टो फार्मा चे डायरेक्टर भाऊसाहेब जंजीरे आणि शशांक वाघ म्हणाले, आपल्याकडे आत्तापर्यंत परंपरेप्रमाणे माणसांचा अंत्यविधी लाकडाच्या सरणावर चिता पेटवून करण्यात येतो. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार व अत्याधुनिक सोयींच्या उपलब्धतेमुळे आता अंत्यविधी गॅस दाहिनीच्या माध्यमातून होणार आहे. लाकडाच्या सरनावरील अंत्यविधीसाठी जवळपास चार ते पाच हजार रूपयांचा खर्च येतो मात्र गॅस दाहिनीमुळे हा खर्च दोन ते अडीच हजार रूपयांच्या आसपास येणार आहे.लाकडाच्या सरनावरती मृतदेह जाळल्यानंतर त्यातून प्रचंड धूर बाहेर येतो, यामुळे होणारे प्रदुषण व निघणारा वायू याचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याउलट गॅस दाहिनीच्या माध्यमातून होणार्या अंत्यविधी नंतर जो दूर बाहेर निघणार आहे त्यामध्ये कोणतेही विषारी घटक नसणार आहेत आणि महत्वाचे म्हणजे धूर बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र चिमणी बसवण्यात येणार असून त्याची उंची 30 मिटर असणार आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीकोनातून ही गॅस दहिनी अत्यंत पुरक असणार आहे.भूमीपूजन झाले, लवकरच काम सुरूआमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या आमदार फंडातून या गॅस दाहिनीची निर्मिती करण्यात येत असून याचे भूमीपूजन नुकतेच आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.राम सातपुते, भाजपा संघटन महामंत्री धैर्यशिल मोहिते-पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, किशोरसिंह माने-पाटील, अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, आजी माजी सदस्य व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.







