अकलूज नगरपरिषद हद्दीतील मालमत्तांचे ‘ड्रोन’ कॅमेर्याने मॅपींग ; कर चुकवेगिरीला बसणार आळा
अकलूज : अकलूज नगरपरिषद हद्दीतील मालमत्तांच्या मोजणीसाठी ड्रोन कॅमेर्याच्या माध्यमातून सर्वेक्षण होणार असून कर चुकवेगीरीला आळा बसण्याबरोबरच अगदी तंतोतंत मॅपींग होणार असल्यामुळे शहरात एकूण किती मालमत्ता आहेत हे समोर येणार आहे.आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतुन अकलूज नगरपरिषदेने ड्रोन मॅपींगचे काम हाती घेतले आहे. अमरावती येथील स्थापत्य कन्सल्टंट या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार्या ड्रोन कॅमेर्याच्या छायाचित्रणाची ‘टेस्ट ड्राईव्ह’ नुकतीच आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.यावेळी माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, देवन्या मोहिते-पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, कार्यालयीन अधिक्षक सुनिल काशिद, कर निरीक्षक बाळासाहेब वाईकर, बांधकाम विभागाचे अभियंता आनंद जाधव, स्थापत्य कन्सल्टंट चे प्रशांत सर, ड्रोन पायलट अच्युतराव यावेळी उपस्थित होते.अकलूज शहराच्या सुमारे 17.9 चौरस किलोमीटर परिसराचे ड्रोन कॅमेर्याने छायाचित्रण केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक मालमत्ता कराच्या कक्षात येणार आहे. नगरपालिका प्रशासनाकडून या कामाचे नियोजन करण्यात येत आहे. हे काम स्थापत्य कन्सल्टंट या कंपनीला देण्यात आले आहे.या कंपनीच्या वतीने मालमत्ता सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे मागविले असून त्याद्वारे शहरातील प्रत्येक मालमत्ता टिपली जाणार आहे. त्या मॅपिंगमध्ये त्या मालमत्तेजवळील रस्ता, नाली, धार्मिक स्थळे व एकुणच सर्व बांधकाम कैद होईल. त्या अनुषंगाने शहरातील प्रत्येक मालमत्ता कराच्या कक्षेत येऊन नगरपालिकेची कराची एकूण मागणी वाढणार आहे.ड्रोनद्वारे काढलेल्या सर्व फोटोची सॅटेलाईट इमेजसोबत पडताळणी करण्यात येणार आहे. शहराचा एकूण परिसर 17.9 चौरस किलोमीटर आहे. त्या सर्व क्षेत्राचे ड्रोनने फोटो काढण्यात येणार आहेत.







