.
अकलूज येथे मॉर्निंग ग्रुपचे स्नेहसंमेलन- एक विलक्षण सोहळा.
संग्रामनगर दि.१६(केदार लोहकरे यांजकडून)
शारीरिक तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायामाच्या निमित्ताने अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलच्या मैदानावर पाच ते सात वर्षांपूर्वी शिक्षण, पोलीस,शेती,वैद्यकीय, बँकिंग,इन्शुरन्स,उद्योग आदी क्षेत्रातील लोक एकत्र आले. रोजच्या सहवासाने ओळखी घट्ट झाल्या, संवाद वाढला, एकमेकांबद्दलचा विश्वास, प्रेम,आपुलकी वाढीस लागली आणि त्यातूनच पुढे मॉर्निंग ग्रुपची निर्मिती झाली.शरीरासोबत मानसिक स्वास्थ्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे हे लक्षात आल्याने तशा पद्धतीने प्रयत्न सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून गड किल्ल्याच्या ट्रेकिंगला सुरुवात झाली.यामध्ये लहान मुले आणि महिलांनी सुद्धा हिरहिरीने सहभाग नोंदवला.आजपर्यंत बघता बघता 30 ते 32 गड-किल्ल्यांचे ट्रेकिंग झाले.अनेक प्रेक्षणीय स्थळांना सहकुटुंब भेटी देऊन तेथील निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद घेतला.सामाजिक कार्यामध्ये आपलेही योगदान असावे यासाठी विविध सामाजिक संस्थाना भेटी देऊन मदत देण्याचा प्रयत्न केला. एकमेकांबद्दल असणारा स्नेह अबाधित रहावा किंबहुना दिवसेंदिवस तो वाढत जावा याच उद्देशाने वर्षातून एकदा सर्व सदस्यांचे कुटुंबीयांसह स्नेह मेळाव्याचे आयोजन केले जाते. अगदी त्याप्रमाणे याही वर्षी अकलूज येथील हॉटेल चेहिता येथे या ग्रुपचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते.
सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात पारंपारिक वेष परीधान करुन आलेल्या स्री-पुरुषाचे हालगी अन् तुतारीच्या गजरात स्वागत करण्यात आले. राजाराम गुजर सर आणि सुहास उरवणे सरांचे समग्र सुत्रसंचालनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. प्रथमतः आलेला सर्वच महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन अन् राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. समाधान देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्नेह संमेलनाचे आयोजन आणि ग्रुपची पुढील वाटचाल याबाबत थोडक्यात भूमिका मांडली.श्री गणेश वंदनेसह झोकात पुढे चाललेल्या गीत- संगीताच्या कार्यक्रमात प्रवीण साठे यांचे बासरी वादन अन् बाळासाहेब माने यांच्या मेंडोलिन वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.तसेच कांतीलाल एकतपूरे यांनी म्हटलेल्या ‘झाल्या तिन्ही सांजा’ या लावणीने,डाॅ.सावंत-पाटील यांनी गायलेला ‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा’ या गाण्यासह समाधान देशमुख यांच्या ‘चांगभलं ‘ या कवितेनं रसिकांमध्ये एक नवा जोश निर्माण केला.
चि.शिवशंकर राजमाने,कु.वैष्णवी माने कु.श्रावणी बाबर आणि कु.शर्मिन मुल्ला यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल तसेच डॉ.शिरीष रणनवरे यांची निमा संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
हे स्नेहसंमेलन यशस्वी पार पडण्यासाठी ग्रुपचे सदस्य वैभव आंबेकर,कांतीलाल एकतपुरे,शिरीष रणनवरे,राहुल पवार,संतोष जाधव,रामचंद्र चौधरी,सुहास क्षीरसागर,डॉ.सुनील राऊत, श्री.माने साहेब (ब्रॅंच मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया) आदी सदस्यांच्या अथक प्रयत्नातून साकारले.हा कार्यक्रमास एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे दोन्ही सूत्रसंचालकांचा व आलेल्या सर्व कलाकारांचा ग्रुपच्या सन्माननीय सदस्यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अंतिम पर्वामध्ये गीत- संगीताच्या तालावर सर्वच सदस्यांनी ठेका धरत सोहळ्यामध्ये बहार आणली.शेवटी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर ‘जगण्यासाठीची एक नवी एनर्जी ठरलेले स्नेहसंमेलन आपण प्रत्येक वर्षी घेऊ या’ या संकल्पासह कार्यक्रमाची सांगता झाली.















