*गरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी तात्काळ देण्यात यावा-शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी*
पंढरपूर प्रतिधीनी….महाराष्ट्र राज्याच्या 35 जिल्ह्यातील367 तालुक्यामधून हजारो रुग्ण मुंबई,पुणे,औरंगाबाद,नागपूर,सोलापूर अशा महत्त्वाच्या महानगरांमध्ये उपचारांसाठी शेकडोंच्या संख्येने दररोज येत असतात.धर्मदाय म्हणविल्या जाणाऱ्या अनेक हॉस्पिटलमध्ये जेव्हा रुग्णाला लाखोंच्या पटीत बिल येते,तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधीचा मोठा दिलासा रुग्णांना पूर्वी मिळत असे.मात्र मागील काही वर्षांमध्ये प्रत्येक रुग्णाला तीन लाख रुपयांपर्यंत मिळणारा मुख्यमंत्री सहायता निधी आता हजारो प्रकरणे दाखल झाल्यानंतर सुद्धा का मिळत नाही?हा भयंकर मोठा संवेदनशील असणारा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक रुग्णांच्या बाबतीत लाखो रुपयांचे बिल आलेले असताना अवघा तीस हजार रुपयांचा निधी मंजूर करून आधीच कोमेजलेल्या रुग्णांच्या चेहऱ्याला पाने पुसण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कार्यकाळात होत आहे,ही अतिशय चिंताजनक व खेदजनक बाब आहे.मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रकरणे दाखल केल्यानंतरही प्रकरण मंजूर झाल्याबाबत किंवा प्रकरण फेटाळले आहे,याबाबत कुठलाही संदेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून दिला जात नसल्याच्या शेकडो तक्रारी शिवस्वराज्य युवा संघटनेकडे दाखल झाल्या आहेत.प्रत्यक्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही रुग्णासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जाणारी मोठी व महत्त्वाची दिलासादायक मदत असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळतच नाही,हे सत्य पचवताना रुग्णांना सद्यपरिस्थितीमध्ये प्रचंड मानसिक त्रास होत आहे.प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असलेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा कक्ष जर इतक्या तकलादूपणे काम करत असेल,तर इतर खात्यांच्या बाबतीत नेमकं काय काम चालत असेल?याचा विचार आणि आत्मपरीक्षण सरकारमधील मंत्र्यांनी करणे गरजेचे आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधी तात्काळ मिळाला पाहिजे.गरीब रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी न मिळणे ही अत्यंत चिंताजनक व खेदजनक बाब आहे.असे शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी म्हटले आहे.







