आमदार राम सातपुतेंच्या मागणीनंतर पशुसंवर्धन विभाग लागला कामाला
लम्पी बाधित जनावरांच्या उपचारासाठी तज्ञ अधिकाऱ्यांचे दोन पथके दाखल
माळशिरस तालुक्यातील लंपी बाधित जनावरांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच जनावरांच्या मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. याच अनुषंगाने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी पशुसंवर्धन मंत्र्यांकडे लंपी मुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या नुकसान भरपाई पोटी तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. तसेच जनावरांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता चिंता व्यक्त करत तज्ञ डॉक्टरांचे पथक पाठविण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून पुणे व उदगीर येथील तज्ञ अधिकाऱ्यांचे पथक हे माळशिरस मतदार संघात दाखल झाले आहे. या पथकांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यातील एक पथक हे नातेपुते व शेजारील गावात तर दुसरे पथक हे कोंडबावी अकलूज या भागात लंपी बाधित जनावरांवर उपचार करत आहे.
दिनांक 3 नोव्हेंबर पर्यंत माळशिरस तालुक्यामध्ये १३५९ जनावरे ही लंपी बाधित होती यापैकी 180 जनावरे ही अंत्यवस्थ स्थितीत होती. तर तालुक्यात आतापर्यंत 126 जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. आजारी जनावरांवर सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी बरे करण्याकरिता प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करीत होते. तरीदेखील जनावरांचा मृत्यूचे प्रमाण हे वाढत होतं याच अनुषंगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांनी पशुसंवर्धन विभागाकडे चिंता व्यक्त केल्यानंतर हे दोन पथक दाखल झाल्याने लम्पी मुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच या आजारामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आ. सातपुते यांनी केले असून सरकार ठामपणे आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.







