सोलापूर /प्रतिनिधी :भैय्या खिलारे:महूद बु|| या ठिकाणी दरवर्षी दिपवाळी मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक 27 ऑक्टोबर पासुन अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. यावर्षी सप्ताहाचे तपपुर्ती सोहळ्याचे वर्ष असल्यामुळे यावर्षीचा कार्यक्रम नेहमीपेक्षा मोठ्या स्वरूपात केला जाणार आहे. या नामसप्ताहामध्ये विविध कलागुणांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवचना ऐवजी विविध सामाजिक विषयांवरती व्याख्याने आयोजित केलेली आहेत. या कार्यक्रमांमध्ये पहाटे काकड आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, व्याख्यान, हरिपाठ, कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. सप्ताहाचे व्यासपीठ गुरुवर्य सुदाम महाराज मतकर आळंदी देवाची यांच्याकडे असणार आहे.त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने ही ठेवण्यात आलेली आहेत. त्यामध्ये अनुक्रमे ह.भ.प.दादासाहेब नरळे गुरुजी म्हसवड, ह.भ.प.मंगेश महाराज माने देशमुख, ह.भ.प.केशव महाराज मुळीक, गुरुवर्य सुरेश महाराज सूळ, गुरुवर्य नारायण महाराज शिंदे, ह.भ.प.शिवाजी महाराज तळेकर, गुरुवर्य, युवकमित्र बंडातात्या कराडकर, गुरुवर्य अनिल महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन अशा नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केलेली आहेत. सकाळी ठीक आठ वाजता ग्रामप्रदक्षणा होईल. वीणा पूजन आणि ग्रंथ पूजनाने या सप्ताहास सुरुवात होईल. सातव्या दिवशी चार वाजता दिंडी प्रदक्षिणा होईल व आठव्या दिवशी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. अशा या ज्ञान यज्ञाचा सर्व ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, अशी पारायण मंडळाकडून विनंती करण्यात आलेली आहे. हा नाम सप्ताह समस्त ग्रामस्थ महूद व व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र. शाखा, महुद बु|| यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.








