श्री गणपती फार्मसीत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा प्रतिनिधी अकोले खुर्द (ता.माढा) येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. महाविद्यालयातील विद्यार्थी ईश्वरी राऊत, प्रगती बिंगे,अक्षय गायकवाड व नितीन केदार यांनी त्यांच्या भाषनांनी वाचनाचे महत्व आणि डॉ. कलाम यांच्या विचारांना उजाळा दिला.डॉ. कलाम यांना शास्त्रज्ञ म्हणून आपली ओळख दाखविण्यापेक्षा एक शिक्षक म्हणून ओळख दाखविण्यात अभिमान वाटत होता असे विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न हे तरुणांच्या जीवावरच पाहिले होते. २०२० पर्यंत भारत महासत्ता होईल असे मत डॉ. कलाम यांनी व्यक्त केले होते कारण देशातील तरुणांकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या तसेच डॉक्टर कलाम यांचे चरित्र अभ्यासल्यास युवकांना जगण्याची नवी दिशा मिळेल असे मत संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. आर.डी.बेंदगुडे यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॕड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. महादेवी भोसले व प्रा. केतकी पाटील यांनी काम केले.







