राज्यातील परिचारिका पदविका अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करा.
ना. चंद्रकांत पाटील यांना धैर्यशील मोहिते पाटील यांचे निवेदन
अकलूज (प्रतिनिधी ): ए.एन.एम. व जी.एन.एम. हा नर्सिंग पदविका अभ्यासक्रम राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने यापूर्वीच व्यावसायिक अभ्यासक्रम (Professional Courses) घोषित केला असून सन २०११ पासून शुल्क नियामक प्राधिकरण (FRA) ही या अभ्यासक्रमांची शुल्क सन २०२१ पर्यंत निश्चित करत आले आहे. पण अचानक दि.१८/०८/२०२२ चे ठरावाने सन २०२२-२०२३ पासून यावरील अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित केले जाणार नाही असे जाहीर केल्याने शुल्क नियामक प्राधिकरण कायदा २०१५ च्या कलम २ (b) (g) (q) (r) अन्वये शुल्क नियामक प्राधिकरण (FRA) यांना राज्यातील परिचारिका पदविका अभ्यासक्रमांची (ANM व GNM) शुल्क सन २०२२ / २०२३ साठी निश्चित करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.सन २०२२-२०२३ च्या विद्यार्थ्यांचे या अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित नसल्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले विद्यार्थी अडचणीत आले आहेत, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ए.एन.एम. व जी.एन.एम. अभ्यासक्रमांना “Appropriate Authority” मान्यता असून हे अभ्यासक्रम शुल्क निश्चित करण्यासाठी या कायद्याने पात्र आहेत. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, आपण आपल्या विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या शुल्क निश्चित प्राधिकरण (FRA) कायदा २०१५ कलम १४ (१) (b) अन्वये सन २०२१ /२०२२ चीच शुल्क यावर्षी सन २०२२/२३ साठी “Upward Revision” करून किंवा FRA मार्फत परिपत्रक काढण्याबाबत बैठक लावून किंवा संबंधितांना निर्देश देऊन हा प्रश्न सोडवावा अशी विनंती यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे. आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार सांगोला येथे भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शुल्क नियामक प्राधिकरण (FRA) यांना राज्यातील परिचारिका पदविका अभ्यासक्रमांची (ANM व GNM) शुल्क सन २०२२-२०२३ साठी निश्चित करण्याबाबत विनंती केली असता चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थी हित लक्षात घेत विषय तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.










