*सुमित्रा पतसंस्थेने फक्त कर्ज न वाटता सामाजिक बांधिलकीही जपली – स्वरूपाराणी मोहिते-पाटील**संस्थेच्या 34 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ;**लवकरच पुर्नवैभव प्राप्त होण्याचा व्यक्त केला विश्वास*
संग्रामनगर दि.२५ (केदार लोहकरे यांजकडून)ज्या वेळेस ग्रामीण भागात राष्ट्रीय बँका सक्रिय नव्हत्या त्यावेळी सुमित्रा पतसंस्थेने फायद्या-तोट्याचा विचार न करता सामाजिक बांधिलकी जपत कर्ज वाटली.सध्या अडचणीचा काळ असला तरी पुढील 2 ते 3 वर्षात पतसंस्थेचला पुर्नवैभव प्राप्त होईल असा विश्वास संस्थेच्या माजी संचालिका व प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला. सुमित्रा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या 34 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.यावेळी चेअरमन महादेव अंधारे,व्हा.चेअरमन विजय शिंदे,दिपक खराडे, अॅड.नितीन खराडे,विजय दोशी,नारायण फुले,अशोक जावळे,अरूण गुजर,सुभाष दळवी,विकास भरते,सौ.शैलेजा गुजर,विलास भरते,शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव हर्षवर्धन खराडे,मॅनेजर प्रताप चव्हाण यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना स्वरूपाराणी म्हणाल्या,संस्थेचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित्रा पतसंस्था हळू हळू पूर्वपदावर येत आहे.यावर्षी 5 लाख रूपयांचा फायदा झाला असून संस्थेला लवकरच पहिले दिवस येतील यात कोणाच्याही मनात शंका नाही.कोणत्याही शासन अथवा इतर संस्थेकडून कर्ज न घेतलेल्या सुमित्रा पतसंस्थेला कर्ज स्वरूपात दिलेले 57 कोटी 5 लाख व त्यावरील व्याज रू.100 कोटी 71 लाख रूपये असे एकूण 157 कोटी 76 लाख रूपये येणे बाकी असून ठेव स्वरूपात असलेले 61 कोटी 04 लाख व त्यावरिल व्याज रू. 14 कोटी 24 लाख असे एकुण रू. 75 कोटी 28 लाख देणे आहे.शिवाय संस्थेकडे 19 कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे सांगतानाच स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी संस्थेचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या ‘कोणाचे पैसे बुडणार नाहीत आणि कोणाला पैसे सोडणार नाही’ या वाक्याचा पुर्नउच्चार करत आश्वस्त केले. केंद्र सरकारच्या धोरणानुसार राष्ट्रीयकृत बँका आता व्यावसायिकांना कर्ज स्वरूपात भांडवल उपलब्ध करून देत आहेत.परंतु दुरदृष्टी असलेले संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील यांनी 25-30 वर्षापूर्वीच व्यावसायिकांना भागभांडवलाचा पुरवठा केला होता.संस्थेचे अद्यापपर्यंत सुमारे 452 व्यवसायिकांना भागभांडवलाच्या स्वरूपातून कर्ज दिलं आहे.तसेच सामाजिक बांधिलकी जपत असताना शहिद जवानांच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी संस्था नेहमीच अग्रेसर राहिली असल्याचेही स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी बोलताना चेअरमन महादेव अंधारे यांनी संस्थेचा आढावा सादर केला.ते म्हणाले,जयसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या नेतृत्वामुळेच आज चालू वर्षाअखेर संस्थेची सभासद संख्या 10,023 एवढी असून संस्थेकडे 95,24,300 रूपयांचे भाग भांडवल आहे.संस्थेने स्थापनेपासुन 34 वर्षात 46,545 कुटुंबांना 1055 कोटी रूपयांचा पतपुरवठा केलेला असुन एकुण 1508 कोटी 63 लाख वसुल केले आहेत. त्यातील एकुण कर्ज वाटपाच्या फक्त 5.40% कर्ज वसुल करावयाचे राहिले आहेत. स्थापनेपासुन संस्थेने 508 कोटी 18 लाख वसुल करून ठेवीदारांना ठेव व्याजापोटी 482 कोटी 02 लाख अदा केले आहेत. अशा प्रकारे संस्थेची मागील 34 वर्षात 2885 कोटींची उलाढाल झाली आहे.














