घुमान सायकल यात्रेसाठी सहकार्य करु : धैर्यशील मोहिते पाटील यांची ग्वाही
अकलूज / प्रतिनिधी – भागवत धर्माचा झेंडा अटकेपार फडकविणा-या संत नामदेव महाराज यांचे कार्य महाराष्ट्रासह उत्तर भारतातही अधिक आहे . त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने निघत असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) या रथ व सायकल यात्रेस सर्वतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली . भागवत धर्म प्रसारक समिती , पालखी सोहळा पत्रकार संघ व नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) अशी दि ४ नोव्हेंबर ते दि ४ डिसेंबर दरम्यान रथ व सायकल यात्रा काढण्यात येणार आहे . या रथ व सायकल यात्रेचे निमंत्रण आ रणजितसिंह मोहिते पाटील , आ राम सातपुते व चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांना देण्यात आले . या यात्रेची माहिती देताना भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे म्हणाले , या सायकल यात्रेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर सायकल रायडिंग केलेले राज्यातील ११० सायकल रायडर्स तसेच वारकरी सहभागी होणार आहेत . या यात्रेच्या नियोजनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी नामदेव शिंपी समाज व वारकऱ्यांची बैठक घेण्यात आली . त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे . मोहिते पाटील म्हणाले , संत नामदेव महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित संत नव्हते . त्यांनी मोगल साम्राज्यात १२ व्या शतकात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला . त्यांचे उत्तर भारतात अनेक मठ व मंदिरे आहेत . पत्रकार संघ , भागवत धर्म प्रचारक समिती व नामदेव शिंपी समाजाने आज ७०० वर्षानंतर हे कार्य हाती घेतले आहे ही कौतुकाची बाब आहे . याप्रसंगी नियोजन समितीचे सदस्य गणेश जामदार , राजू लोहोकरे , संतोष भोसले , कृष्णा लावंड , नामदेव महाराज युवक संघटनेचे अध्यक्ष श्रेयश चांडोले , सचिन जवंजाळ , वैभव जामदार , विजय चांडोले , सुयोग सोडळ यांच्यासह समाज संघटनेचे पदाधिकारी व वारकरी उपस्थित होते .







