अकलूज मधील ए वन पान शॉप वर अन्न व औषध प्रशासन यांची कारवाई. इतर दुकानदारांनी विक्री बंद करावी. अन्यथा कारवाई करणार -अन्न सुरक्षा अधिकारी -प्रज्ञा सुरसे.
अकलूज(प्रतिनिधी )अकलूज परिसरातील पान टपऱ्यावर 7सप्टेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाने धाडी टाकून कारवाई केली.सदुभाऊ चौकातील सदाशिवराव माने विद्यालया समोरील ए वन पान शॉप या दुकानावर अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी छापा टाकून प्रतिबंधित गुटखा व मावा जप्त करुन विक्रेत्यावर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.नागरीकांच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सदुभाऊ चौकातील सदाशिवराव माने विद्यालय या शाळेच्या समोरच असलेल्या ए वन पान शॉप मध्ये खुलेआम प्रतिबंधित गुटखा व माव्याची विक्री होत असल्याची तक्रार सोलापूर येथिल अत्र व औषध प्रशासनाच्या अधिकारी यांचेकडे आली , या तक्रारीची तातडीने दखल घेत पथकाने ए वन पान शॉप या दुकानावर छापा टाकला.यावेळी दुकानामध्ये प्रतिबंधीत ८५ पाऊच आरएमडी पान मसाला,एम सुगंधी तंबाखू ६० पाऊच व तंबाखु मिश्रित मावा आढळून आला.याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या तक्रारी वरुन दुकानदार अतिक अकबर शेख, (वय २४ वर्षे,रा, शिवतेजनगर-यशवंतनगर) यांचे विरुद्ध अत्र सुरक्षा व मानदे कायद्यातील शिक्षापात्र कलम ५९ व भादविसक १८८, २७२, २७३, ३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपी दुकानदारास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच हे दुकान शील करण्यात आले आहे.सदरचे पान शॉप हे शाळेच्या नजीक असल्याने कारवाई करण्यात आली आहे.इतर पान शॉप वाल्यांनी प्रतिबंधित गुटखा व मावा विक्री बंद करावी अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असे अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे म्हणाल्या. पुढील तपास अकलूज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांचे मार्गदर्शन खाली अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस उ्प निरीक्षक एस. बी. जगताप हे करत आहेत. अकलूज आणि परिसरात अनेक पान टपरी, किराणा दुकान, हॉटेल, या ठिकाणी प्रतिबंध असलेला गुटखा, मावा, सुगंधी सुपारी यांची राजरोसपणे विक्री होत आहे. त्यामुळे नागरिकांबरोबरच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने तक्रारी ची वाट न बघता होलसेल विक्रेते व किरकोळ विक्रेते यांचेवर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.







