*गाय व बैलाचा विवाह लावून साजरा केला अनोखा बैल पोळा सण….!*
संग्रामनगर दि.२६ (केदार लोहकरे याजकडून)माळशिरस तालुक्यातील संगम येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव ताटे-देशमुख यांनी बैल पोळा सणाच्या दिवशी बैलांना व गायीला नटवून सजवून गावात मिरवणूक काढून सायंकाळी बैल व गायीच्या अंगावर तांदुळाच्या अक्षता टाकून विवाह लावण्यात आला ही परंपरा त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यापासून चालत आली आहे. संगम येथील प्रगतशील बागायतदार विठ्ठलराव माणिकराव ताटे-देशमुख यांनी बैल पोळा कसा साजरा करतो याची माहिती सांगताना म्हणाले की,पूर्वी बैलपोळा म्हणजे शेतकऱ्याचा खूप आनंदाचा व उत्साहाचा सण होता.बैलपोळा आदल्या दिवशी घराला तोरण बांधले जायची,कायम कष्टाची कामे करणाऱ्या बैल राजाची खांदे मळणी केली जात असे ती आज ही करतो.तसेच खांदे मळणी दिवशी बैलास तेल,गुळवणी,हळद,मीठ असे एकत्र बाटलीतून पेय पाजले जाते.खांदे मळणी दिवशी बैलाचा खांद्या वरून मूळ (कंसा सारख गवत )फिरवलं जात असते.त्यांनतर बैलाची शिंगे घोळतात,चंगाळी,झूल तयारी केली जात असते.बैल पोळा दिवशी बैल धुणे,रंग लावणे,बैगिड शिंगास लावणे,अंगावर झूल टाकून,पारंपरिक वाद्य सह गावातून मिरवणूक काढली जाते.मिरवणुकी नंतर बैल व गाई यांचा विवाह लावला जातो.यावेळी मंगल अष्टका म्हणाल्या जातात व बैलास पुरणपोळीचा नैवेध दाखवला जातो. पूर्वी आमच्या गावा जवळील गिरवी,नरसिंहपूर,टनु,शेवरे येथून लोक बैल पोळ्या करीता उपस्थित राहत असत.पूर्वी शेतीची सर्व कामे बैलाकडुन केली जात असत परंतु आता आधुनिक यंत्रे आल्यामुळे बैलाची संख्या कमी झाली.आम्ही बैलराजाला आज ही मानाचे स्थान दिले आहे.नवीन पिढीला बैल पोळा सण काय व शेतकरी बैलाचे अतूट नाते माहित व्हावे याकरिता बैल पोळा सण उत्साहात साजरा करतो.











