प्रशासनाच्या वतीने केले जंगी स्वागत.स. मा. वी च्या प्रांगणात जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
प्रशासनाच्या वतीने केले जंगी स्वागत.स. मा. वी च्या प्रांगणात जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण.
अकलूज (गणेश जाधव )भेटी लागी जीवा लागलीसे आस..या संत तुकोबांच्या अभंगात वर्णील्याप्रमाणे विठ्ठलाच्या भेटीसाठी आसवलेल्या पालखी सोहळयाचे सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे मोठया भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या पालखी सोहळ्याचे प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वागत केले.संत तुकाराम महाराजांची पालखी नीरा नदी ओलांडून सकाळी ८.२० ला अकलूज येथे आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी त्यांच्या सुविद्य पत्नी करूणा स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी श्री.परीट यांनी भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप दिला.संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूज येथील गांधी चौकात येताच नगरपरिषदेच्यावतीने माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक दयानंद गोरे आदि मान्यवर उपस्थित होते. गांधी चौकातून विजय चौक, श्री विठ्ठल मंदिर, आंबेडकर चौक या मार्गावरून सदूभाऊ चौकातील सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर पालखी विसावली. येथे गोल रिंगण मोठ्या भक्तिवाय वातावरणात पार पडले. 5जुलै रोजी पालखीचा अकलूज येथे मुक्काम असून 6जुलै रोजी माळीनगरकडे प्रस्थान केले.माळीनगर येथे जिल्ह्यातील पहिले उभे रिंगण झाले. त्यानंतर पालखी बोरगाव मुक्कामी जाणार आहे.*जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले पालखीचे सारथ्य.*संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत केल्यानंतर स्वागताच्या ठिकाणापासून अकलूज येथील गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होते.त्यानंतर सदुभाऊ चौकातील स. मा. वी. च्या भव्य प्रांगणात आकाशात फडफडणाऱ्या पताका व टाळ मृदंगाच्या निनादात, ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात लक्ष लक्ष डोळ्यांचे पारणे फेडणारा जगदगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील जिल्ह्यातील पहिला गोल रिंगण सोहळा सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य मैदानावर उत्साहात पार पडला.संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन आज अकलूज येथे सकाळी नऊ वाजता झाले. गांधी चोकात पालखीचे स्वागत माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले. त्यानंतर प्रथेनुसार विजय चौक ,विठ्ठल मंदिर आंबेडकर चौक मार्गे सदुभाऊ चौकातील सदाशिव माने विद्यालयच्या रिंगणस्थळी आली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, काँग्रेसचे नेते नानासाहेब पटोले, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील,धैर्यशील मोहिते पाटील,संग्रामसिंह मोहिते पाटील, धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह सर्व मोहिते पाटील कुटुंबीय उपस्थित होते. प्रथम पताका धारकांनी गोल रिंगण घेतले त्यानंतर तुळशीधारक महिलाभगीणी, विणेकरी यांनी धाव घेतली तर टाळकरी यांनी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात रिंगणधाव घेतली. यानंतर दोन्ही अश्वांचे पूजन विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि दोन्ही अश्व वायू वेगाने धावले. क्षणार्धात वाऱ्याच्या सुसाट धावणाऱ्या मानाच्या आश्वांचा लाखो वारकरी, भक्तांनी ग्रामस्थांनी याची देही, याची डोळा थरार अणुभवला.*काल भरपूर पाऊस होऊनही रिंगण स्थळावर अतिशय चांगले नियोजन करण्यात आले होते.*- *देहू संस्थांनचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे.**या सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अकलूज चे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, करमाळ्याचे उप विभागीय अधिकारी डॉ.विशाल हिरे, सोलापूर येथून आलेले अतिरिक्त पोलीस अकलूज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर व पोलीस मित्र परिवार चे संस्थापक रमेश सुरवसे पाटील यांच्यासह पोलीस मित्रांनी चोख बंदोबस्त ठेवला.*













