*अकलूज आगारातर्फे बस स्थानकावर प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून मिठाई वाटप.*




🔵अकलूज आगारातर्फे बस स्थानकावर प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून मिठाई वाटप
महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ “एस्.टी”.च्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त अकलूज एस.टी. आगारामध्ये प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून मिठाई वाटप करण्यात आले. या निमित्ताने बसस्थानकाच्या दर्शनी भागात आकर्षक रांगोळीने सजावट करण्यात आलेली होती. मांगल्याचे प्रतीक केळीचे खुंट आणि नारळाच्या झावळ्यांनी स्थानकाचे खांब सजविण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक “अकलूज वैभव” चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे हे उपस्थित होते. अकलूज आगारातर्फे आगाराचे व्यवस्थापक तानाजी ज्ञानोबा पवार, सहाय्यक वाहतूक अधीक्षक विकास उत्तम पोफळे, वाहतूक निरीक्षक संजय सर्जेराव वायदंडे, वाहतूक नियंत्रक तुकाराम राऊत, आगार लेखाकार सौ. लता शंकर खबाणे , माजी सुरक्षारक्षक अनिल भगवान गायकवाड यांच्यासह आगार कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावर उपस्थित असणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करून मिठाई वाटप केले. याप्रसंगी सर्व ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, पत्रकार कृष्णा लक्ष्मण लावंड, वृत्त एकसत्ता चे कार्यकारी संपादक सुनिल ज्ञानेश्वर कांबळे, सिद्धार्थ उर्फ गरीबदास नामदेव गायकवाड,वृत्तपत्र विक्री स्टॉल मालक प्रमोद दिनकर कुलकर्णी,वृत्तपत्र विक्रेते महेश मनोहर कुलकर्णी,अखिल भारतीय ग्राहक मंच तर्फे भागवत भिमराव शिंदे आणि अमित प्रेमसागर पुंज इत्यादी मान्यवरांनी एसटी महामंडळाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आगारातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना गुलाबपुष्पासह शुभेच्छा दिल्या.
याच वेळी सर्व जेष्ठ पत्रकार नायकुडे यांना पत्रकारिते मधील 48 वर्षाच्या योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज आगार, पत्रकार,प्रवासी संघ, वृत्तपत्र विक्रेते,अखिल भारतीय ग्राहक मंच, अकलूज शहर रिक्षा संघटना इत्यादींच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
🟣 ब्रिटिश काळामध्ये 1932 ला प्रवासी वाहतुकीसाठी खाजगी वाहनांना परवानगी देण्यात आलेली होती. त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर खाजगी प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद करून बॉम्बे प्रांत म्हणजे बॉम्बे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कार्पोरेशन( B.S.R.T.C.)ची स्थापना करण्यात आली. आणि तत्कालिन बॉम्बे प्रांत सरकारने 1 जून 1948 रोजी पहिली एस्.टी. बस प्रवासी सेवेअंतर्गत पुणे ते अहमदनगर ही एसटी सोडण्यात आली. या घटनेला आज 74 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त सर्वत्र हा वर्धापनदिन साजरा होत आहे. मुंबई प्रांत सरकार हे संस्थापक असलेले बी एस आर टी सी (BSRTC)चे मुंबई प्रांत बरखास्ती नंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ” (MSRTC) असे नामकरण झाले. साध्या बसगाड्या 14022, शहर बसगाड्या 651, निम आराम बसगाड्या 544, मिनी बसगाड्या 199, डीलक्स बसगाड्या 48, वातानुकूलित बसगाड्या 26, मिडीगाड्या 10. आहेत. राज्यात एसटी बस गाड्यांची बांधणी दापोडी – पुणे, चिकलठाणा – औरंगाबाद, हिंगणा – नागपुर या तीन ठिकाणी होत असून प्रशिक्षण सेंटर फक्त भोसरी पुणे येथे आहे.गाव तिथे एसटी या पद्धतीने महाराष्ट्रभर एसटीचे जाळे वाढविण्याचे काम वेगाने सुरू आहे. सध्या आंतरराज्य वाहतुकी अंतर्गत एसटीची कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा या सहा राज्यात एसटीची वाहतूक सुरू आहे. कोरोनाच्या काळापूर्वी दररोज सुमारे 65 लाख प्रवाशांची वाहतूक एसटी सेवेद्वारे होत होती. तथापी कोरोना महामारी मुळे एसटी बस सेवा बंद ठेवावी लागली. त्यानंतर कर्मचार्यांच्या संपामुळे ही व्यवस्था कोलमडून पडली. परंतु पुन्हा नव्या जोमाने लालपरी (एसटी)प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे.












