टेंभुर्णी परिसरात अवैध धंदे जोमात
.टेंभुर्णी (प्रतिनिधी ) :- सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टेंभूर्णी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अनेक अवैध व्यवसाय जोमात सुरु आहेत. कायद्याने बंदी असलेला गुटखा, अनेकांचे संसार देशोधडीला लावणारा मटका, जुगार, अवैध दारूविक्री, गांजा,वाळू,मुरुम, गोमांस वहातूक, खाजगी सावकारकी, अवैध भिशी,ठिकठिकाणी असलेल्या लॉजवर वेश्या व्यवसाय यासह अनेक अवैध व्यवसाय जोमात सुरु आहेत.टेंभुर्णी परिसरात अवैध व्यवसायाने अक्षरशः धुमाकुळ घतला आहे. ठिकठिकाणी मटक्याचे एजंट आहेत. त्यांनी या भागातील गावोगावी मटका बुकींसाठी जाळे पसरले आहे. परिसरातील अनेक तरुण, आबाल वृद्ध मोठ्या संख्येने अवैध धंद्याकडे वळत आहेत. कमीत कमी भांडवलात अल्पावधीत अधिकाधिक पैसे मिळविण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. परिणामी गुटखा विक्री, मटका, जुगार,गांजा, मुरुम, बेकायदा दारुविक्री, वाळू तस्करी, खाजगी सावकारकी अशा अनेक काळ्या धंद्यात तरुण गुरफटले आहेत. दररोज हजारों रुपयांचा मटका खेळुन काहींजण कंगाल झाले आहेत . तर काहीजण उसणवारी,कर्ज काढुन मटका खेळत आहेत.काहींनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. टेंभुर्णी मध्ये अनेक मटका बुकी चालक आहेत आणि तेही ऑनलाइन मोबाईल वरती मटका घेत आहेत मटका बुकी चालकाकडून तसेच गुटका विक्रेते पोलीस प्रशासनासोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक हित संबंध ठेऊन राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरत असल्याने अशा अवैध धंदे करणाऱ्या कडे डोळेझाक केली जात असल्याने त्यांच्या विरोधात कोणी तक्रार करीत नाहीत .पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय अवैद्य धंदे खुलेआम कोणीही करू शकत नाही.खेड्यापाड्यातुन अनेकजण कामाला जातो म्हणुन सांगुन येथे दिवसभर मटका जुगार खेळत असतात. त्यांचे संसार उध्वस्त होत आहेत.अवैध धंद्यांची पोलिसांना माहिती असताना अर्थपुर्ण संबंधामुळे व राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास ते धजावत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.. अवैध व्यावसायांना जास्त विरोध झाल्यास मोठ्या धेंडाना वाचवण्यासाठी मग किरकोळ व लहान विक्रेत्यावर कारवाई करण्याचे काम पोलिस करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस काळ्या धंद्यात वाढच होत आहे.दरम्यान, आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यावर तर शासनाने बंदी घातली असतानाही पोलीसांच्या आशिर्वादाने खुलेआम गुटखा विकला जात आहे. मटका व गुटखा विक्रेते, एजंटना राजाश्रय असल्याने कोणालाही न जुमानता ते व्यवसाय करीत आहेत. मटका व गुटख्याचा व्यवसाय येथे जोमात सुरू असुन बेकायदा दारू विक्रीतही वाढ झाली आहे. परिसरातील गावोगावचे लोक येथील विविध हॉटेल, ढाब्यांवर मद्यपानासाठी येत आहेत. परिणामी काळ्या धंद्यात दररोज लाखोंची कमाई होत आहे. त्या पैशांचा गैरवापर होऊन सामाजिक वातावरण कलुशीत होत आहे.वरिष्ठ पोलीसांनी टेंभुर्णी परिसरातील मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या अवैध व्यवसाय बंद करावेत.लोकांचे उध्वस्त होणारे संसार वाचवावेत अशी मागणी टेंभुर्णी व परिसरातील नागरिक करीत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते या गोष्टीकडे लक्ष देतील काय?असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. टेंभूर्णी पोलीसांचे अवैध व्यावसायीकांबरोबर असलेले अर्थपुर्ण संबंध तपासण्यासाठी सोलापूरच्या डॅशिंग लेडी सिंघम तेजस्विनी सातपुते यांनी सायबर वरुन त्यांचे गेल्या सहा महिन्याचे मोबाईल कॉल डिटेल व पोलीस ठाण्यातील सिसिटीव्ही फुटेज तपासावेत अशी मागणी केली जात आहे.







