कुठे थांबायचे कळले पाहिजे……!
भाषण, कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे आपल्या जीवनातही घडते. प्रसिद्ध लेखक डॉ. अवचट यांनी त्यांच्या मृत्यूच्या पंधरा दिवसाअधी समाधानी आयुष्य जगल्यावर कुठं थांबायला हवं यावर भाष्य केलं. आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना आलेली विरक्ती आणि त्यातून त्यांनी सुरु केलेली निरवानिरव दिसून येत आहे. ‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते…! हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे. जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो. विसर्जन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे आहे. कधी कोणता किती लांब जाईल आणि फुटेल हे सांगता येत नाही. माणसाचे जीवन हे माचीसच्या पेटीसारखे आहे. तिला गांभीर्याने घेणे हास्यास्पद आहे. निष्काळजी असणे धोकादायक आहे म्हणून असे जगा की जणू आता आपल्याला जीवनाचा निरोप घ्यायचा आहे, जणू काही आपल्याला साठी सोडलेली वेळ ही एक अनपेक्षित भेट आहे. जीवन हे थिएटरमधील नाटकासारखे आहे. ते किती काळ चालते हे महत्त्वाचे नाही, तर ते किती चांगले खेळले जाते हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती हा कामाचा अति ताण, जीवघेणी स्पर्धा, रोजची धावपळ, मानसिक ताणतणाव यामध्ये इतका गुरफुटला आहे की कुठे थांबावे हे त्याला कळेनासे झाले आहे. विराम, विश्राम इत्यादी गोष्टी आयुष्यातून निघून गेल्या की काय असे वाटायला लागले आहे. आज अशांती उद्विग्नता, द्वेष, व्याकुळता, चिंता, ईर्ष्या, घृणा, आक्रोश, क्रोध इत्यादींनी जीवन वेढलेले आहे. वैयक्तिक पातळीप्रमाणेच सामाजिक पातळीवरही, मानमरातब, धर्म, एकता, सुरक्षा, वर्चस्व अशा अनेक कारणांनी तणाव वाढत आहे. ह्या सर्वातून मुक्तता मिळविण्यासाठी जीवनात टिकाऊ आनंद कसा मिळेल याचा प्रत्येकाने शोध घेण्यासाठी आयुष्यात कुठेतरी थांबावे. जीवनाचा एक नियम सांगतो की एक दरवाजा बंद होताच दुसरा उघडतो. परंतु संपूर्ण त्रास हा आहे की आपण बंद दरवाजाकडे पाहतो आणि उघडलेल्याकडे लक्ष देत नाही.डॉक्टर म्हणतात आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही. जीव संपला तरी हावरटपणा जात नाही. छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही. स्वत:ची पर्वा नसते का..? तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्यासारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो.ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते. मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे मायाजाल न संपणारे आहेत. त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच. यशस्वी होण्यासाठी सर्वांची धडपड सुरू असते. यश मिळवता येईलही, परंतु त्याला समाधानाची जोड नसेल, तर कुठे थांबावे, हे आपल्याला कळणारच नाही. आपण यशाच्या मागे धावत राहू नये म्हणून एका तत्त्ववेत्याने यशाची व्याख्या आपल्या वयानुसार कशी बदलत जाते, त्याचे छान वर्णन केले आहे. तुम्ही, आम्ही, आपण सगळेच या परिस्थितून जात आहोत, जाणार आहोत. त्यामुळे यशाची परिमाणे आताच निश्चित केली, तर यशामागे धावताना धाप लागणार नाही आणि वेळोवेळी आयुष्याचा आनंदही घेता येईल. आपण काय, कशासाठी करतोय? त्यातून काय मिळणार, साध्य होणार ? हे आपल्याला काही वेळा कळतच नसते. आपण आपल्या मनाशी एक ध्येय ठरवलेलं असते आणि ते साध्य करण्यासाठी फक्त धावत असतो. काही काळानंतर मागे वळून पाहतो तेंव्हा कदाचित ज्या ध्येयासाठी संपूर्ण आयुष्य आपण घालवलेलं असत ते आपण मिळवलेल ही नसते पण त्या नादात आपण आपलं जगणं नक्कीच गमावलेल असते कारण धावता धावता आपल्याला “थांबायच” ही असते हे आयुष्याच्या धकाधकित आपण पूर्ण विसरूनच गेलेलो असतो. स्वप्नं पाहणं मानवाचा स्वभावर्म आहे, पाहिलेले स्वप्नं पूर्ण सत्यात उतरविणे ही मानवाच्या जीवनाची खरी कसोटी आहे. काहीजण एकाच स्वप्नाच्या पूर्तेतेसाठी अहोरात्र कष्ट घेतात. काहीजण अर्धवट वेगवेगळी स्वप्नं पाहतात. प्रयत्न कमी पडले की मध्येच सोडुन दुसऱ्या स्वप्नांच्या पाठी लागतात आशांच्या नशिबी सहसा पश्चात्तापच येतो. नंतर पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा वेळ काळ ओळखून थांबलेले बरे. एखादी व्यक्ती शहाणी असते जेव्हा त्याला तो क्षण समजतो तेंव्हा आपल्याला काहीतरी बोलण्याची, गप्प बसण्याची किंवा कुठे थांबायचे हे ओळखतो. जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो..! झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे. निसर्गाने कुणालाही सोडलेले नाही. मंग आपण का? धावपळ करायची. आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर थांबावे नाहीतर निसर्गाचे काम चालूच आहे. लक्षात ठेवा दुसर्याला दुःखाच्या खाईत लोटून आपली ‘पोळी’ भाजून घेणारेही आढळतात. पण ते खऱ्या अर्थाने आनंदीत नसतात. खरा आनंद दुसर्याच्या दुःखावर कधीच पोसला जात नसतो. आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येक वेळी उगाचच धावायची गरज नसतेच मुळात ” कुठे थांबायचं ” हे कळलं की आपोआप आयुष्य बदलत….प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज9226144836(लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात)












