“डॉ.कै.नंदकुमार देवडीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त स्थूलत्व व मधुमेह मुक्त भारत अभियान अंतर्गत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या मोफत व्याख्यानाचा लाभ घ्यावा -डॉ. श्रीकांत देवडीकर.
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील देवडीकर हॉस्पिटल चे संस्थापक कै. नंदकुमार देवडीकर यांच्या 18व्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचे स्थूलत्व व मधुमेह मुक्त भारत अभियान अंतर्गत अकलूज येथे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले असून,महाराष्ट्र राज्याचे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील,जिजामाता कृषी भूषणपुरस्काराने सन्मानित झालेल्या सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जि. प. सदस्या सौ. शितलदेवी मोहिते पाटील या मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.अकलूज आणि परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन अकलूज येथील डॉ. श्रीकांत नंदकुमार देवडीकर यांनी केले आहे.
अकलूज येथील देवडीकर हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये डॉ. श्रीकांत देवडीकर आणि डॉ. मानसी देवडीकर यांनी हीं माहिती दिली.
ते पुढे बोलताना म्हणाले की,21मे या दिवशी कै. डॉ. नंदकुमार देवडीकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गेल्या 17वर्षांपासून प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आजपर्यंत रक्तदान, मोफत आरोग्य शिबीर, तसेच अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून फिल्टर देखील देण्यात आला आहे. यावर्षी 18वी पुण्यतिथी असून या निमित्त मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
कै. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यापासून प्रेरणा घेऊन, डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१३ पासून “स्थूलत्व व मधुमेह मुक्त विश्व” अभियान सुरु केले आहे. या अभियानात ४१ देशातील लाखो लोक सहभागी झालेले आहेत. संपूर्णपणे विनामूल्य असलेले हे अभियान देशात आणि परदेशातही अतिशय लोकप्रिय झाले आहे.या अभियानाची, जीवनशैलीची, त्यात मिळालेल्या यशाची आणि पुढील शक्यतांची माहिती समस्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी या उद्दिष्टाने व्याख्यानाचे आयोजन दिनांक 21 मे 2022 रोजी पाटीदार भवन, अकलूज, तालुका माळशिरस, सोलापूर येथे देवडिकर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
सायंकाळी 6 वाजता व्याख्यान सुरू होईल .
दीक्षित सर जीवनशैली बाबत मार्गदर्शन करतील आणि उपस्थितांच्या शंकांचे निरसन करतील.
या अभियाना विषयी अधिक माहिती देताना डॉ. मानसी देवडीकर यांनी सांगितले की,२०१८ मध्ये या अभियानाचे ध्येय गाठण्यासाठी असोसिएशन फॉर डायबेटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल अर्थात ‘अडोर’ या धर्मादाय संस्थेची स्थापना पुण्यात करण्यात आली. आज अडोर तर्फे देशात १३ शहरात मधुमेह मुक्ती केंद्रे आणि २१ ठिकाणी डॉ दीक्षित जीवनशैली विनामूल्य सल्ला केंद्रे चालवली जातात. या केंद्रांचा फायदा आजवर हजारो रुग्णांनी घेतला आहे.
आज भारतात मधुमेहाचे ७.७ कोटी रुग्ण आहेत. या पैकी निम्म्या लोकांना त्यांना मधुमेह आहे हेच माहीत नसते! जवळपास इतक्याच प्रमाणात मधुमेह पूर्व अवस्थेतील लोक आहेत. मधुमेहाच्या आणि त्यात होणाऱ्या गुंतागुंतींच्या उपचारांचा खर्च भारतासारख्या देशाला परवडण्यासारखा नाही. त्यामुळे त्याचा प्रतिबंध करणे हेच श्रेयस्कर होईल.
या अभियानात अशा जीवनशैलीचा पुरस्कार केला जातो जी फुकट आहे, त्यासाठी डॉक्टर लागत नाही, कोणतेही उपकरण लागत नाही, बाजारातून कोणतीही पावडर विकत घ्यावी लागत नाही.आणि मुख्य म्हणजे आयुष्यभर व्यक्ती आनंदाने तिचे अनुकरण करू शकते.
या जीवनशैलीचा अंगीकार केल्याने वजन तर कमी होतेच. पण मधुमेह प्रतिबंध आणि मुक्तीही मिळू शकते. हे अभियानातील आजवरच्या अनुभवावरून आणि संशोधनावरून लक्षात आले आहे.
अभियानाद्वारे राबवण्यात आलेले संशोधन प्रकल्प, इतर उपक्रम, मिळालेले यश आणि त्याचा मधुमेह या भयंकर आजारावर होणारा परिणाम तसेच देशासाठी त्याचे महत्व आणि भविष्यातील दिशा याचा उहापोह ते करणार आहेत.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक डॉ. श्रीकांत देवडीकर आणि डॉ. मानसी देवडीकर यांनी केले आहे.















