कोरोना महामारीत ‘होमियोपॅथी’शिवाय मात करणे शक्य नव्हते- आरोग्यमंत्री राजेश टोपे
औरंगाबाद- कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सर्वजन प्रयत्न करत असताना होमियोपॅथी डॉक्टरांनी महत्वपूर्ण योगदान दिले. तुमच्या सहकार्याशिवाय महामारीवर मात करणे शक्य नव्हते. आगामी काळात सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये होमियोपॅथी तज्ज्ञांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (दि.१४) दिले.
होमियोपॅथीक मेडिकल असोसिएशन आॅफ इंडियाच्या वतीने आयोजित बाविसाव्या आॅल इंडिया होमियोपॅथीक सायंटिफिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, आ. विक्रम काळे, डॉ. अरुण भस्मे, डॉ. बाळासाहेब पवार, पृथ्वीराज पाटील, डॉ. पी.वाय. कुलकर्णी, डॉ. रामजी सिंग, डॉ. सोमनाथ गोसावी,डॉ.बाळकृष्ण गायकवाड,डॉ. प्रतिक तांबे, डॉ.कांचन देसरडा, डॉ.किशोर मालोकार, डॉ.दादा कविश्वर , डॉ.अमित भस्मे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजेश टोपे म्हणाले, कोरोनाच्या लढाईत होमियोपॅथीचा सुध्दा वापर करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक पॅथींची वेगळी बलस्थाने आहेत. जीवनशैलीशी निगडीत आजारांमध्ये होमियोपॅथीचे योगदान लक्षणीय आहे. आयुष मंत्रालयात तुुमच्यावर अन्याय झालेला आहे. आयुर्वेदिक, युनानीच्या तुलनेत होमीयोपॅथीकडे दुर्लक्ष झाल्याने तुम्हाला विषमतेला सामोरे जावे लागत आहे. या सर्वच बाबींची नोंद आरोग्यमंत्री या नात्याने मी घेतली आहे. इतर राज्यांप्रमाणे आरोग्य विभागातील कायम स्वरुपातील नोकऱ्यांमध्ये होमियोपॅथी तज्ज्ञांचा समावेश व्हावा, यासाठी आग्रही असून कायद्यात बदल करून तरतूद करावी लागणार आहे. डॉ. भागवत कराड हेही या परिषदेत उपस्थित आहेत. तेही आपल्या मागण्यासंदर्भात पाठपुरावा नक्कीच करतील. त्यांनी संबंधित खात्यांचे मंत्री, अधिकाऱ्यांची दिल्लीमध्ये बैठक बोलवावी. आम्ही या बैठकीस येऊन सकारात्मक निर्णय घेण्यासाठी तयार असल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांचाही आमदार हवा
विधानपरिषदेमध्ये शिक्षक, पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून आमदार निवडून दिले जातात. वैद्यकीय क्षेत्रामधील समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी सुध्दा ‘डॉक्टरांचा’ प्रतिनिधी आमदार म्हणून निवडून जायला हवा. तसे झाल्यास डॉक्टरांचे प्रश्न नक्कीच सुटतील. वैद्यकीय क्षेत्र, डॉक्टरांबद्दल आस्था असलेले डॉ. बाळासाहेब पवार हे आमदार म्हणून आल्यास नक्कीच या क्षेत्राचा विकास, डॉक्टरांचे प्रश्न सुटतील, अशी अपेक्षाही राजेश टोपे यांनी व्यक्त केली.




















